अबुधाबी - कोलकाता नाइट रायडर्स संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 9 गडी राखून पराभव केला. या विजयासह केकेआरचे स्पर्धेतील आव्हान कायम आहे. केकेआरच्या शिस्तबद्ध माऱ्यासमोर आरसीबीचा संघ 19 षटकात 92 धावांवर सर्वबाद झाला. तेव्हा केकेआरने हे आव्हान 1 गड्याच्या मोबदल्यात सहज पूर्ण केले. शुबमन गिलने 34 चेंडूत 48 धावांची खेळी साकारली.
केकेआरने डेब्यू सामना खेळत असलेल्या व्यंकटेश अय्यरला शुबमन गिलसोबत सलामीला पाठवले. दोघांनी आरसीबीच्या गोलंदांजाचा खसपूस समाचार घेतला. या जोडीने 9.1 षटकात 82 धावांची सलामी दिली. फटकेबाजी करण्याच्या नादात शुबमन गिल बाद झाला. त्याने 34 चेंडूत 48 धावांची खेळी केली. यात त्याने 6 चौकार आणि 1 षटकार खेचला. त्याला दुसऱ्या बाजूने व्यंकटेश अय्यरची चांगली साथ लाभली.
युझवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर गिल बाद झाल्यानंतर स्फोटक फलंदाज आंद्रे रसेल मैदानात उतरला. पण दुसऱ्या बाजूने व्यंकटेश अय्यरने आरसीबीच्या गोलंदाजांवर जोरदार हल्ला चढवला आणि केकेआरच्या विजयावर 10व्या षटकातच शिक्कामोर्तब केले. तो 27 चेंडूत 7 चौकार आणि 1 षटकारांसह 41 धावांवर नाबाद राहिला. तर आंद्रे रसेल शून्यावर नाबाद राहिला. आरसीबीकडून एकमात्र विकेट युझवेंद्र चहलला मिळाली.
तत्पूर्वी, आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा केकेआरच्या गोलंदाजांनी शिस्तबद्ध मारा करत आरसीबीच्या फलंदाजांना वेसन घातलं. विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल आणि ए बी डिव्हिलियर्स हे दिग्गज अपयशी ठरले. आरसीबीला कशीबशी 92 धावांपर्यंत मजल मारता आली. केकेआरकडून वरुण चक्रवर्ती आणि आंद्रे रसेल यांनी प्रत्येकी 3-3 गडी बाद करत आरसीबीची फलंदाजी कापून काढली. तर लॉकी फर्ग्युसन याने 2 तर प्रसिद्ध कृष्णाने 1 गडी बाद केला.
हेही वाचा - भारतीय खेळाडू 2021-22 मध्ये राहणार व्यस्त, 'हे' संघ करणार भारताचा दौरा
हेही वाचा - KKR vs RCB: केकेआरच्या शिस्तबद्ध माऱ्यासमोर आरसीबी 92 धावांत गारद