चेन्नई - आयपीएल २०२१ मध्ये मंगळवारी झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाचे कोलकाता नाईट रायडर्सच्या तोंडातून विजयाचा घास हिसकावून आणला. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने सूर्यकुमार यादव ५६ आणि रोहित शर्मा ४३ यांच्या खेळीच्या जोरावर निर्धारित २० षटकात १५२ धावा केल्या होत्या. या माफक धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्सने दमदार सुरुवात केली. नितीश राणा ५७ आणि शुबमन गिल ३३ यांनी पहिल्या विकेटसाठी ७२ धावांची भागीदारी केली. यानंतर मुंबईच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा केला आणि मुंबईने हा सामना १० धावांनी जिंकला. या विजयानंतर कर्णधार रोहित शर्माने, आपल्या गोलंदाजांचे कौतूक केलं.
सामना संपल्यानंतर रोहित शर्मा म्हणाला, 'केकेआरकडून ज्या पद्धतीने फलंदाजी सुरू होती. ती पाहता आम्ही सामन्यात शानदार वापसी केली. गोलंदाजीसाठी आलेल्या प्रत्येक जण संघासाठी योगदान देऊ इच्छित होता. या विजयाने आमच्या आत्मविश्वासात भर पडेल. अनेक गोष्टी सकारात्मक राहिल्या.'
पुढे रोहित म्हणाला, केकेआरने सुरूवातीच्या पहिल्या ६ षटकात चांगली फलंदाजी केली. पण पॉवर प्लेनंतर राहुल चहरने महत्वाची विकेट्स घेत आम्हाला सामन्यात वापसी करून दिली. कृणालने देखील चांगली गोलंदाजी केली. प्रामाणिकपणे मी सर्व गोलंदाजांचे कौतूक करतो. त्यांनी संघासाठी आपलं मोलाचं योगदान दिले.
मुंबई इंडियन्सचा संघ सलग दुसऱ्या सामन्यात डेथ ओव्हरमध्ये वेगाने धावा करण्यात अपयशी ठरला. यावर रोहित म्हणाला, डेथ ओव्हरमध्ये आम्ही आणखी १५ ते २० धावा करायला हव्या होत्या. पण आम्ही त्या करू शकलो नाही. यावर आम्हाला चिंतन करणे गरजेचे आहे. सूर्यकुमारने आपली लय कायम राखली आहे. तो निडरपणे फलंदाजी करतो. त्याचे मोठे फटके पाहून वाटत नाही की तो जोखीम घेत असतो.
दरम्यान, १५३ धावांचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्सने दमदार सुरुवात केली. नितीश राणा ५७ आणि शुबमन गिल ३३ यांनी पहिल्या विकेटसाठी ७२ धावांची भागीदारी केली. राहुल चाहरने सेट झालेल्या या दोघांसह राहुल त्रिपाठी ५, इयॉन मॉर्गन ७ धावांवर माघारी धाडले. शेवटच्या दोन षटकात बुमराह आणि बोल्टने टिच्चून गोलंदाजी केली. डावाच्या शेवटच्या षटकात १५ धावांची गरज असताना बोल्टने रसेल आणि कमिन्स यांना बाद केलं आणि मुंबईने यंदाच्या हंगामातील आपला पहिला विजय नोंदवला.
हेही वाचा - IPL २०२१ : केकेआरचा लाजिरवाणा पराभव; शाहरूख खानने मागितली चाहत्यांची माफी
हेही वाचा - IPL २०२१ : बोट तुटल्यामुळे बेन स्टोक्स आयपीएलमधून बाहेर, राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का