लंडन - आयपीएलमध्ये खेळणाऱ्या ११ इंग्लंड खेळाडूपैकी ८ खेळाडू मायदेशी परतले आहेत. इंग्लंड अॅन्ड वेल्स क्रिकेट बोर्डाने याची माहिती दिली. भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने तसेच खेळाडूंना देखील कोरोनाची लागण झाल्याने, बीसीसीआयने आयपीएलचा चौदावा हंगाम मंगळवारी तात्काळ स्थगित केला. यानंतर आता खेळाडू आपापल्या घरी परतत आहेत.
इंग्लंड क्रिकेट संघाचे प्रवक्ता डॅनी हुबेन यांनी सांगितलं की, 'आठ खेळाडू इंग्लंडमध्ये परतले आहेत. राहिलेले तीन खेळाडू पुढील २४ तासांत भारत सोडतील. इंग्लंडमध्ये दाखल झालेले खेळाडू पुढील काही दिवस हॉटेलमध्ये क्वारंटाईन राहतील.'
दरम्यान, भारतात ख्रिस जॉर्डन, डेव्हिड मलान आणि इयॉन मॉर्गन हे पुढील ४८ तासात इंग्लंडसाठी रवाना होण्याची शक्यता आहे.
हे खेळाडू पोहोचले इंग्लंडला -
जॉनी बेयरस्टो (हैदराबाद), जोस बटलर (राजस्थान), सॅम कुरेन (चेन्नई), टॉम कुरेन (दिल्ली), सॅम बिलिंग्स (दिल्ली), ख्रिस वोक्स (दिल्ली), मोईन अली (चेन्नई) आणि जेसन रॉय (हैदराबाद) हे खेळाडू इंग्लडला पोहोचले आहेत.
इंग्लंडमध्ये दाखल झालेल्या सर्व खेळाडूंना इंग्लंडच्या नियमानुसार, पुढील दहा दिवस सरकारद्वारे निश्चित केलेल्या हॉटेलमध्ये क्वारंटाईन राहावे लागणार आहे. दरम्यान, भारतात कोरोनाचा रुग्ण वाढत आहे. यामुळे काही दिवसांपूर्वीच इंग्लंडने भारताला रेड झोनमध्ये टाकलं आहे. त्यांनी भारतातून इंग्लंडमध्ये येणाऱ्या प्रत्येकाला क्वारंटाईनची सक्ती केली आहे.
हेही वाचा - IPLच्या स्थगितीनंतर आता टी-२० विश्व करंडकावरही संकट; भारताऐवजी 'या' देशात स्पर्धा होण्याची शक्यता
हेही वाचा - IPL २०२१ : आपल्या सलामीवीर जोडीदाराकडून यशस्वी जैस्वालला मिळालं खास गिफ्ट, पाहा फोटो