मोहाली - सलामीवीर लोकेश राहुलचे अर्धशतक, त्याला मिळालेली निकोलस आणि ख्रिस गेलची साथ यामुळे पंजाबने अखेरच्या साखळी सामन्यात चेन्नईवर ६ गडी राखून विजय मिळवला आहे. दरम्यान, यापूर्वीच पंजाबचे या स्पर्धेतेतील आव्हान संपुष्टात आलेले आहे.
लोकेश राहुल आणि ख्रिस गेल यांनी पहिल्या विकेटसाठी १०८ धावांची भागीदारी केली. हरभजन सिंहने आपल्या षटकात लागोपाठच्या चेंडूवर राहुल आणि गेलला बाद केले. मात्र, पंजाबच्या इतर फलंदाजांनी आपल्या संघाचे आव्हान कायम राखत विजयावर शिक्कामोर्तब केले. चेन्नईकडून हरभजन सिंहने सर्वात जास्त ३ तर, रविंद्र जाडेजाने १ बळी घेतला.
तत्पूर्वी, सलामीवीर फाफ डु प्लेसिसची तुफान ९६ धावांची खेळी आणि त्याला रैनाच्या अर्धशतकी खेळीचे बळ या जोरावर चेन्नईने पंजाबला १७१ धावांचे आव्हान दिले. डावखुऱ्या सॅम करनने शेन वॉटसनचा त्रिफळा उडवत सुरुवातीलाच पहिला धक्का दिला. मात्र, फाफ डु प्लेसिस याने संयमी खेळी करत दमदार अर्धशतक ठोकले. हे अर्धशतक त्याने ३७ चेंडूत पूर्ण केले. डु प्लेसिस पाठोपाठ सुरेश रैनानेही आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने ३४ चेंडूत ही कामगिरी केली. अर्धशतक पूर्ण केल्यानंतर रैना बाद झाला. त्याने ५ चौकार आणि २ षटकार लगावत ३८ चेंडूत ५३ धावा केल्या. तर, डु प्लेसिसचे शतक केवळ ४ धावांनी हुकले. त्याने ५५ चेंडूत ९६ धावांची झंजावाती खेळी केली. या खेळीमध्ये त्याने १० चौकार आणि ४ षटकार लगावले.
यानंतर, अंबाती रायडू केवळ १ धाव करून माघारी परतला. तर, केदार जाधवला पहिल्याच चेंडूवर मोहम्मद शमीने त्रिफळाचीत केले. त्यामुळे चेन्नईला २० षटकात ५ बाद १७० धावापर्यंत मजल मारता आली.