बंगळुरू - चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या आयपीएलच्या १७ व्या सामन्यात कोलकात्याने बंगळुरूचा ५ गडी राखून पराभव केला. बंगळुरूने कोलकातापुढे विजयासाठी २०६ धावांचे आव्हान ठेवले होते. कोलकात्याने आंद्रे रसेलच्या वादळी १३ चेंडुत ४८ धावांच्या जोरावर हे आव्हान १९.१ षटकातच पूर्ण केले.
कोलकात्याकडून ख्रिस लीन ४३, रॉबिन उथप्पा ३३, नीतिश राणा ३७ आणि आंद्रे रसेल याच्या ४८ धावाच्या जोरावर हे आव्हान पार केले. रसेलने अवघ्या १३ चेंडूत सात षटकारांच्या मदतीने तुफानी खेळी साकारून कोलकातासाठी विजय खेचून आणला आणि बंगळुरूच्या यंदाच्या मोसमातील पहिल्या विजयाचे स्वप्न मोडले. बंगळुरूकडून पवन नेगीने २, नवदीप सैनी २ आणि युझवेंद्र चहलने १ गडी बाद केला.
कोलकाताच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विराटने फलंदाजीस पोषक असलेल्या खेळपट्टीचा फायदा उचलत चांगली कामगिरी केली. त्याने ४९ चेंडूत ८४ धावांची खेळी केली. त्यात ९ चौकार आणि २ षटकारांचा समावेश आहे. विराट कोहली आणि एबी डिविलियर्स यांनी अर्धशतकीय खेळी केल्यामुळे आरसीबीने २० षटकात ३ बाद २०५ धावा रचल्या होत्या.
एबी डिविलियर्सने त्याला सुरेख साथ देत ६३ धावांची खेळी केली. त्याने ३२ चेंडूत ६३ धावांची स्फोटक खेळी केल्याने आरसीबीच्या संघाला दोनशे पर्यंत मजल मारता आली. मार्कस २८ तर पार्थिव पटेलने २५ धावांचे योगदान दिले. कोलकाताकडून कुलदीप यादव, सुनील नरेन आणि नीतिश राणा यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.