मुंबई - भारतीय महिला क्रिकेट संघाची युवा खेळाडू प्रिया पूनिया हिच्या आईचे कोरोनामुळे निधन झाले. प्रियाच्या आईने आज अखेरचा श्वास घेतला. याची माहिती प्रियाने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली.
प्रिया पूनियाच्या आईला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान, त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आईच्या निधनानंतर प्रियाने इन्स्टाग्राम पोस्ट लिहित तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
प्रियाने तिच्या पोस्टमध्ये काय म्हटलं -
'तू मला नेहमी कणखर राहण्यास का सांगत होतीस, हे आता लक्षात येत आहे. एक दिवस तुला गमावण्याचे दुःख मला सहन करावे लागेल, हे तुला माहीत होते आणि त्यासाठी तू मला कणखर बनवलंस. पण मला तुझी आठवण येत आहे आई. तू माझ्यापासून कितीही लांब असलीस, तरी तू नेहमी माझ्यासोबत आहेस. मला योग्य मार्ग दाखवणार. आयुष्यात सर्व प्रसंगांचा स्वीकार करणे अवघड आहे, अशा आशयाची भावनिक पोस्ट लिहित प्रियाने तिच्या दु:खाला वाट मोकळी करून दिली आहे.
प्रियाने तिच्या पोस्टमध्ये सर्वांना कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन देखील केले आहे. दरम्यान, प्रियाच्या आधी भारताची महिला क्रिकेटपटू वेदा कृष्णमुर्ती हिने कोरोनामुळे आई व बहिणीला गमावलं आहे.
भारतीय महिला क्रिकेट संघ पुढील महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यासाठी प्रियाची निवड भारतीय संघात आहे. प्रियाने २०१९ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय संघातून पदार्पण केले होते. तिने ५ एकदिवसीय सामन्यात ४३.७५च्या सरासरीने १७५ धावा केल्या आहेत.
हेही वाचा - मोहम्मद शमी निवृत्तीनंतर काय करणार? जाणून घ्या
हेही वाचा - India tour of England: भारतीय संघाला लंडन सरकारकडून मोठा दिलासा