अॅडलेड - भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. अॅडलेडमध्ये खेळल्या जाणाऱ्या दिवस-रात्र कसोटीत विराटने ७४ धावा करत खास विक्रम नोंदवला.
हेही वाचा - भारताचा वेगवान गोलंदाज श्रीशांतला 'या' संघात मिळाले स्थान
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय कर्णधार -
विराटने माजी कर्णधार मन्सूर अली खान पतौदी यांचा विक्रम मोडला आहे. विराट आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय कर्णधार बनला आहे. पतौदी यांनी ११ कसोटीत ८२९ धावा केल्या होत्या. त्यांच्या या कामगिरीत एक शतक व आठ अर्धशतकांचा समावेश होता.
तर, विराट कोहलीने १० कसोटी सामन्यांमध्ये ८५१ धावा केल्या आहेत. या १० सामन्यात त्याने चार शतके ठोकली आहेत. कोहलीने पतौदी यांचा ५१ वर्ष जुना विक्रम मोडला आहे. महत्त्वाचे म्हणजे कर्णधार कोहलीने पुन्हा एकदा संघर्षमय परिस्थितीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध अर्धशतक ठोकले.
भारताच्या पहिल्या दिवशी दोनशेपार धावा -
भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान बॉर्डर-गावस्कर चषक कसोटी मालिकेतील पहिला सामना येथे सुरू आहे. पहिल्या डावात प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाने पहिल्या दिवसात ६ बाद २३३ धावा फलकावर लावल्या. कर्णधार विराट कोहलीने ७४ धावांची शानदार खेळी केली. शतकाकडे वाटचाल सुरू असताना तो धावबाद झाला. नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.