अहमदनगर - तब्बल तीन दशकांचा दुष्काळ संपवत कर्णधार अजिंक्य रहाणेच्या भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध गाबा खेळपट्टीवर विजय नोंदवला. बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेचा चौथा सामना ब्रिस्बेनच्या गाबा खेळपट्टीवर खेळवण्यात आला. या मैदानावर मागील ३२ वर्षांपासून भारताला विजय मिळवता आला नव्हता. मात्र, अंजिक्य रहाणेच्या संघाने हा इतिहास घडवला. शिवाय, ही मालिकाही २-१ अशी नावावर केली. या कामगिरीनंतर अजिंक्यच्या गावात आनंद साजरा करण्यात आला आहे. असलेल्या संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी गावातील लोकांनी आणि अजिंक्यच्या घरातील सदस्यांनी फटाके फोडून आपला आनंद व्यक्त केला.
हेही वाचा - "ग्रेट भारत'', पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूंकडून अजिंक्यसेनेचे कौतुक
संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी हे नाशिक पुणे महामार्गालगतचे गाव आहे. भारतीय कसोटी संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणेचे हे मूळ गाव. अजिंक्यचा जन्म संगमनेर तालुक्यातील आश्वी या मामाच्या गावी झाला. वडिलांच्या नोकरीनिमित्त अजिंक्यचे कुटुंब मुबंईत स्थायिक झाले. मात्र, अजिंक्यची आजी झेलूबाई, चुलते सीताराम व चुलती लक्ष्मीबाई हे चंदनापुरी गावातच राहतात. अजिंक्यच्या कामगिरीनंतर त्याच्या आजीने आपल्या कुटुंबातील सदस्यांना पेढे भरवत आनंद साजरा केला. तर ग्रामस्थांनी असलेल्या घराबाहेर फटाके फोडत विजयाचा जल्लोष केला. अजिंक्य आपल्या आजीचा अत्यंत लाडका आहे. गावातील अजिंक्यच्या बंगल्याचे नावही झेलू आहे. झेलू आजीने वयाची शंभरी पूर्ण केली आहे.
पिछाडीनंतर मालिकेत बाजी
दरम्यान, पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा मानहानीकारक पराभव झाला. यानंतर भारतीय संघाने अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात मेलबर्न येथे खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ८ गडी राखून विजय मिळवला. यानंतर हनुमा विहारी आणि आर. अश्विन यांनी संयम आणि जिद्दीने फलंदाजी करत सिडनी येथील तिसरा कसोटी सामना अनिर्णित राखला. चौथ्या कसोटी सामन्यात सांघिक खेळ करत भारतीय संघाने विजय मिळवला आणि मालिका २-१ ने जिंकली.