ब्रिस्बेन : नाणेफेक जिंकून फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने भारतासमोर उपाहारापर्यंत २ बाद ६५ धावा केल्या आहेत. सिडनी कसोटीत सामनावीर पुरस्कार पटकावलेला स्टिव्ह स्मिथ ३० तर, मार्नस लाबुशेन १९ धावांवर खेळत आहे. ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर उभय संघात निर्णायक कसोटी सुरू आहे.
ऑस्ट्रेलियाच्या डावाच्या पहिल्या षटकात भारताचा जलदगती गोलंदाज मोहम्मद सिराजने सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला बाद केले. वॉर्नर एका धावेवर असताना सिराजने त्याला स्लिपमध्ये असलेल्या रोहित र्शमाकडे झेल देण्यास भाग पाडले. तर, शार्दुल ठाकुरने मार्कस हॅरिसला बाद करत यजमान संघाला दुसरा धक्का दिला. उपाहारापर्यंत २७ षटकांचा खेळ झाला.
हेही वाचा - 'स्टार' क्रिकेटपटूमध्ये कोरोनाचा नवीन स्ट्रेन!
आजच्या सामन्यात भारताकडून टी. नटराजन आणि वॉशिंग्टन सुंदर या दोन खेळाडूंनी पदार्पण केले आहे. सिडनी कसोटीत दुखापत झालेले जसप्रीत बुमराह, रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा आणि हनुमा विहारी या सामन्यात खेळत नसल्याने नटराजन आणि सुंदरला कसोटी पदार्पणाची संधी मिळाली आहे. तर, ऑस्ट्रेलियाकडून विल पुकोव्स्की संघाबाहेर असून मार्कस हॅरिसला सामना खेळण्याची संधी मिळाली.
ऑस्ट्रेलियाचा लेगस्पिनर नाथन लायन आज १०० वा कसोटी सामना खेळत आहे. यजमान संघाने काल गुरुवारीच आपला अंतिम संघ जाहीर केला. ब्रिस्बेन येथे होणारा हा सामना कसोटी मालिकेतील निर्णायक सामना आहे. कारण या मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने तर दुसऱ्या सामन्यात भारताने विजय मिळवला होता, तसेच तिसरा सामना अनिर्णित राहिला.