ओवल - इंग्लंडविरुद्ध ओवलमध्ये खेळल्या जात असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने इतिहास रचला. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 100 विकेटचा टप्पा गाठला. त्याने हा कारनामा अवघ्या 24 कसोटीत केला आहे. या कामगिरीसह त्याने भारताचे महान अष्टपैलू खेळाडू कपिल देव यांचा विक्रम मोडीत काढला.
जसप्रीत बुमराह, भारतासाठी जलद 100 विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. कपिल देव यांनी 25 कसोटी सामन्यात 100 विकेटचा टप्पा गाठला होता. बुमराहने ओवल कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी ओली पोपला क्लीन बोल्ड करत कसोटी क्रिकेटमधील 100 विकेट पूर्ण केले.
भारतासाठी आतापर्यंत 7 वेगवान गोलंदाजांनी कसोटी क्रिकेटमध्ये 100 किंवा त्याहून अधिक विकेट घेतल्या आहेत. या यादीत कपिल देव, जहीर खान, जवागल श्रीनाथ, इशांत शर्मा, करसन घावरी, इरफान पठाण आणि मोहम्मद शमीचा समावेश आहे.
अनिल कुंबळे अव्वल
ओवरऑल भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम अनिल कुंबळे यांच्या नावे आहे. त्यांनी 619 गडी बाद केले आहेत. तर सर्वात जलद 100 गडी बाद करण्याचा कारनामा आर. अश्विन याने केला आहे. त्याने 18 सामन्यात ही किमया साधली होती.
कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वात जास्त विकेट घेणारे गोलंदाज -
- अनिल कुंबळे - 132 कसोटीत 619 विकेट
- कपिल देव - 131 कसोटीत 434 विकेट
- हरभजन सिंग - 103 कसोटीत 417 विकेट
- आर. अश्विन 79 कसोटीत 413 विकेट
- इशांत शर्मा - 103 कसोटीत 311 विकेट
- जहीर खान - 92 कसोटीत 311 विकेट
हेही वाचा - टी-20 विश्वकरंडक स्पर्धेआधी पाकिस्तान क्रिकेटमध्ये भूकंप, मिसबाह उल हकसह वकार युनूसचा राजीनामा
हेही वाचा - IND vs ENG: हसीब हमीद आणि रोरी बर्न्सची अर्धशतके, इंग्लंडच्या उपहारापर्यंत 2 बाद 131 धावा