लीड्स - भारत आणि इंग्लंड यांच्यात लीड्स येथे तिसरा कसोटी सामना सुरू आहे. उभय संघातील या सामन्याच्या पहिल्या दिवशी काही प्रेक्षकांनी भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजवर चेंडू फेकल्याची चर्चा आहे. याविषयावर यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने खुलासा केला आहे.
काय आहे प्रकरण -
मोहम्मद सिराज सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षक करत होता. तेव्हा प्रेक्षकांमधील एकाने सिराजवर चेंडू फेकून मारला. टीव्ही कॅमेऱ्यात ही दृश्ये रेकॉर्ड झाली.
मोहम्मद सिराजसोबत झालेली ही घटना पाहून भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली भडकला. त्याने तो चेंडू प्रेक्षकांत भिरकावून मारण्याचा इशारा सिराजला केला.
ऋषभ पंत काय म्हणाला -
मोहम्मद सिराज सोबत झालेल्या या घटनेविषयी ऋषभ पंतला विचारले असता, पंत म्हणाला की, 'मला वाटत प्रेक्षकांमधील एकाने सिराजवर चेंडू फेकून मारला. यामुळे विराट कोहली नाराज झाला. तुम्ही एखादे वेळेस काही म्हणू शकता, पण क्षेत्ररक्षकांवर वस्तू फेकू नये. ही बाब क्रिकेटसाठी चांगली नाही. असे मला वाटतं.'
दरम्यान, याधी इंग्लंडमधील प्रेक्षकांनी मोहम्मद सिराजसह के एल राहुलला लक्ष्य केले होते. त्याआधी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सिराजला वर्णद्वेषी टीकेला सामोरे जावे लागले होते. काही प्रेक्षकांनी सिराजला शिवीगाळ केली होती. यावेळी देखील विराट कोहलीने नाराजी व्यक्त करत सिराजला पाठिंबा दिला होता.
लीड्स कसोटीत भारत पिछाडीवर
भारतीय क्रिकेट संघाने तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघासमोर सपशेल लोटांगण घातले आहे. जेम्स अँडरसन, क्रेग ओवरटन, ओली रॉबिन्सन आणि सॅम कुरेनच्या भेदक माऱ्यासमोर भारतीय दिग्गजांनी शरणागती पत्कारली आणि भारताचा पहिला डाव अवघ्या 78 धावांत आटोपला. त्यानंतर इंग्लंडच्या फलंदाजांनी पहिल्या दिवसाअखेर बिनबाद 120 धावांपर्यंत मजल मारली. इंग्लंड संघाची पहिल्या डावात 42 धावांची आघाडी झाली आहे.
हेही वाचा - IPL 2021: राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यात नवा भिडू, अँड्रू टायची घेणार जागा
हेही वाचा - IND vs ENG: बर्न्स-हमीदचे अर्धशतक, इंग्लंडची पहिल्या दिवसाअखेर भारतावर 42 धावांची आघाडी