लंडन - भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात देखील पावसाने व्यत्यय आणला. पावसामुळे पहिल्या दिवसाच्या खेळाला उशिरा सुरूवात झाली. त्यानंतर पावसामुळेच ६ मिनिटे आधी लंचचा ब्रेक घ्यावा लागला. लंचपर्यंत भारताने बिनबाद 46 धावा केल्या आहेत.
भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्याची कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. ही मालिका जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतर्गत होत आहे. उभय संघातील पहिला सामना नॉटिंघममध्ये पार पडला. पण हा सामना पावसामुळे ड्रॉ राहिला. आजपासून दुसऱ्या कसोटी सामन्याला क्रिकेटची पंढरी लॉर्डस येथे सुरूवात झाली.
इंग्लंड संघाचा कर्णधार जो रुटने या सामन्यात नाणेफक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक झाल्यानंतर पावसाला सुरूवात झाली. यामुळे सामना उशिरा सुरू झाला. पाऊस थांबल्यानंतर भारतीय सलामीवीर जोडी रोहित शर्मा आणि केएल राहुल मैदानात उतरले. दोघांनी सावध सुरूवात केली. लंच ब्रेकला 6 मिनिटाचा अवधी शिल्लक होता. तेव्हा पुन्हा पावसाने हजेरी लावली. यामुळे लंच ब्रेक 6 मिनिटे आधी घ्यावा लागला. लंच ब्रेकपर्यंत भारताने बिनबाद 46 धावा केल्या आहेत. त्यात रोहित शर्माच्या ३५ आणि लोकेशच्या १० धावांचा समावेश आहे.
शार्दुल ठाकूरला दुखापत झाल्याने तो या सामन्यातून बाहेर पडला आहे. त्याच्या जागेवर अंतिम संघात इशांत शर्माला स्थान मिळालं आहे. दुसरीकडे इंग्लंडने आज संघात तीन बदल केले. प्रमुख गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याने दुखापतीमुळे मालिकेतूनच माघार घेतली आहे. त्याव्यतिरिक्त आजच्या सामन्यात झॅक क्राउली व डॅन लॉरेन्स यांना विश्रांती दिली असून त्यांच्या जागी हसीब हमीद, मोईन अली आणि मार्क वूड यांची निवड केली आहे.
हेही वाचा - Exclusive: टीम इंडियाच्या प्लेईंग 11 बाबत मोहम्मद कैफचे मत, म्हणाला...
हेही वाचा - कास्य पदक जिंकणाऱ्या मनप्रीत सिंगने आईच्या कुशीत घेतला विसावा, फोटो होतोय व्हायरल