लखनऊ Cricket World Cup २०२३ : विश्वचषकातील १४ वा सामना ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यात आज खेळला गेला. लखनौच्या अटल बिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर हा सामना झाला. या सामन्यात श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता.
जोश इंग्लिश-मिशेल मार्शचं अर्धशतक : ऑस्ट्रेलियानं श्रीलंकेचा ५ गडी राखून पराभव केला. श्रीलंकेनं दिलेलं २१० धावांचं लक्ष्य ऑस्ट्रेलियानं ३५.२ षटकांत ५ गडी गमावून गाठलं. ऑस्ट्रेलियाकडून जोश इंग्लिशनं ५९ चेंडूत सर्वाधिक ५८ धावा केल्या, तर मिशेल मार्शनं ५१ चेडूत ५२ धावांचं योगदान दिलं. श्रीलंकेकडून दिलशान मदुशंकानं चांगली गोलंदाजी केली. त्यानं ९ षटकांत ३८ धावा देत ३ बळी घेतले.
श्रीलंकेच्या ओपनर्सची धुवांधार सुरुवात : प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेच्या ओपनर्सनं धुवांधार सुरुवात केली. कुसल परेरा आणि पथुम निसांका या दोघांनीही अर्धशतक झळकावत १०० धावांची भागिदारी केली. निसांका ६७ चेंडूत ८ चौकारांच्या मदतीनं ६१ धावा करून परतला. त्याला कर्णधार कमिन्सनं वॉर्नरच्या हाती झेलबाद केलं. ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेची संपूर्ण टीम ४३.३ षटकांत २०९ धावांवर आऊट झाली. श्रीलंकेकडून कुसल परेरानं ८२ चेंडूत सर्वाधिक ७८ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून फिरकीपटू अॅडम झम्पानं ४७ धावा देत ४ बळी घेतले.
श्रीलंका नव्या कर्णधारासह उतरणार : या सामन्यात ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व पॅट कमिन्सकडे होतं. तर श्रीलंकेची धुरा कुसल मेंडिसच्या हाती होती. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात झालेल्या दुखापतीमुळं श्रीलंकेचा नियमित कर्णधार दसून शनाका या विश्वचषकातून बाहेर पडला आहे. या सामन्यासाठी श्रीलंकेनं आपल्या संघात दोन बदल केले होते. तर ऑस्ट्रेलियानं तोच संघ कायम ठेवला होता.
दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन :
ऑस्ट्रेलिया : डेव्हिड वॉर्नर, मिशेल मार्श, स्टीव स्मिथ, मार्नस लाबुशेन, जोश इंग्लिश (यष्टीरक्षक), ग्लेन मैक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स (कर्णधार), अॅडम झम्पा, जोश हेजलवूड
श्रीलंका : पथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस (कर्णधार/यष्टीरक्षक), सदीरा समरविक्रमा, चरिथ असलांका, धनंजय डी सिल्वा, दुनिथ वेलालेगे, चमिका करुणारत्ने, महेश तिक्ष्णा, दिलशान मदुशंका, लहिरु कुमारा
हेही वाचा :