हैदराबाद Farokh Engineer : क्रिकेट विश्वचषकाचा रोमांच दिवसेंदिवस वाढत चाललाय. उपांत्य फेरीतील ४ संघ निश्चित झाले असून आता हे संघ विश्वविजेतेपदासाठी आपसात भिडतील. या विश्वचषकात भारताची कामगिरी दमदार राहिली. भारतानं परफेक्ट रेकॉर्ड राखत उपांत्य फेरीत प्रवेश केला. आता उपांत्य फेरीत भारताचा सामना चौथ्या क्रमांकावरील न्यूझीलंडशी होणार आहे. गेल्या वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडनं भारताचा उपांत्य फेरीत पराभव करत विजेतेपदाचं स्वप्न भंग केलं होतं. आता भारत या विश्वचषकात त्या पराभवाचे उट्टे काढण्यास आतूर असेल. टीम इंडियाच्या या कामगिरीबाबत दिग्गज खेळाडू फारूख इंजिनियर यांनी 'ईटीव्ही भारत'शी खास बातचीत केली.
ही टीम चॅम्पियन आहे : फारूख इंजिनियर म्हणाले, 'यजमान देश म्हणून टीम इंडियाची आतापर्यंतची कामगिरी विलक्षण राहिली. आपण विश्वचषकातील सर्वोत्तम संघ आहोत. मी आतापर्यंत पाहिलेल्या भारताच्या सर्वात मजबूत संघांपैकी हा एक आहे. ही टीम प्रत्येक क्षेत्रात संतुलित दिसते. संघानं क्षेत्ररक्षणात कमालीची सुधारणा केलीये', असं ते म्हणाले. 'भारताच्या पहिल्या मॅच नंतर मी माझ्या मित्रांना सांगितलं होतं की, 'ही टीम चॅम्पियन आहे'. भारतच विश्वविजेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे, असं त्यांनी नमूद केलं.
भारत अपयशी होण्याचं कोणतंही कारण नाही : भारतानं २०१५ आणि २०१९ विश्वचषकाच्या साखळी सामन्यात दमदार कामगिरी करत उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. मात्र दोन्ही वेळा त्यांना उपांत्य फेरीचा अडथळा पार करता आला नाही. फारूख इंजिनियर यांच्या मते, भारताची ही विश्वचषक मोहीम मागच्या मोहिमांपेक्षा वेगळी आहे. 'टीम इंडियाच्या फलंदाजीत किंवा गोलंदाजीत इतकी खोली या आधी कधीच नव्हती. भारत या विश्वचषकात अपयशी होण्याचं कोणतंही कारण मला दिसत नाही', असं ते म्हणाले.
राहुल द्रविडनं रवी शास्त्रींचा वारसा चालवला : यावेळी बोलताना फारूख इंजिनियर यांनी टीम इंडियाचे कोच राहुल द्रविड यांचंही कौतुक केलं. 'राहुल द्रविडनं कोच म्हणून अप्रतिम कामगिरी बजावली आहे', असं ते म्हणाले. 'राहुल द्रविडनं रवी शास्त्रींचा वारसा चालवला. त्यांच्यामुळे टीम इंडिया अत्यंत आकर्षक आणि सकारात्मक ब्रॅन्ड ऑफ क्रिकेट खेळत आहे, जे कोणत्याही परिस्थितीत सामना जिंकण्यासाठी आवश्यक आहे', असं त्यांनी नमूद केलं. तसंच कर्णधार रोहित शर्मा पुढे येऊन संघाचं नेतृत्व करतोय. तो या विश्वचषकात स्वत:साठी नव्हे तर संघासाठी खेळला, असंही फारूख इंजिनियर म्हणाले.
हार्दिकचं संघात नसणं दुर्दैवी : टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या दुखापतीमुळे विश्वचषकातून बाहेर पडला. फारूख इंजिनियर यांनी हार्दिकचं संघात नसणं दुर्दैवी असल्याचं म्हटलं. 'हार्दिक हा उच्च दर्जाचा ऑलराउंडर आहे. मात्र तो संघात नसणं दुर्दैवी आहे. टीममध्ये फक्त ११ खेळाडू खेळू शकतात. यातूनच भारताची बेंच स्ट्रेंथ दिसते. हार्दिकची उणीव कोणत्या संघाला भासणार नाही? मात्र शमी हा त्याच्याएवढाच चांगला आहे', असं ते म्हणाले. 'जसप्रीत बुमराह त्याच्या करियरचं सर्वोत्तम क्रिकेट खेळतोय. कुलदीपचे चेंडू विदेशी खेळाडूंना वाचता येत नाहीत. सिराज, जडेजा आणि विराटही आपलं सर्वोत्तम देत आहेत. एखाद्या संघाचा कर्णधार आपल्या टीमकडून आणखी कोणती अपेक्षा करू शकतो', असं ते म्हणाले.
अफगाणिस्तानच्या संघाचा मोठा समर्थक : अफगाणिस्तान संघाच्या या विश्वचषकातील कामगिरीनं सर्वांनाच प्रभावित केलं. ते ९ सामन्यात ४ विजयासह गुणतालिकेत सहाव्या स्थानी आहेत. फारूख इंजिनियर यांनीही अफगाणिस्तान टीमच्या या कामगिरीचं कौतुक केलं. 'मी अफगाणिस्तानच्या संघाचा मोठा समर्थक आहे. त्यांनी ओळख मिळवण्यासाठी संघर्ष केला, मात्र येणाऱ्या काळात ते जागतिक क्रिकेटमधील एक मजबूत संघ असतील', असं ते म्हणाले. 'अफगाणिस्तानंच फिरकी आक्रमण जगातील सर्वोत्तम आहे. त्यांचे फलंदाजही चांगले आहेत. त्यांच्याकडे फक्त अनुभवाची कमतरता आहे', असं त्यांनी नमूद केलं.
हेही वाचा :