अहमदाबाद Cricket World Cup २०२३ : विश्वचषक २०२३ मध्ये भारत आणि पाकिस्तानचे संघ मजबूत दिसत आहेत. दोन्ही संघाचे २ सामने जिंकून समान गुण आहेत. श्रीलंकेविरुद्ध वेगवान आणि आक्रमक खेळी खेळून मोहम्मद रिझवाननं पाकिस्तानच्या विजयाची जबाबदारी आपल्या खांद्यावर असल्याचं सिद्ध केलं. आता शनिवारी हे दोन्ही संघ जगातील सर्वात मोठ्या स्टेडियममध्ये आमनेसामने येणार आहेत. या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा आणि बाबर आझमसह दोन्ही संघांवर प्रचंड दबाव असेल.
कागदावर टीम इंडिया मजबूत : तसं पाहिलं तर कागदावर टीम इंडिया मजबूत दिसते. विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध भारताचा ७-० असा उत्कृष्ट रेकॉर्ड आहे. या सामन्यात भारतीय संघ त्यांच्या घरेलू मैदानावर खेळेल, तर पाकिस्तानी संघाला जगातील नंबर १ संघाविरुद्ध १,३२,००० चाहत्यांसमोर लढावं लागेल. या मैदानावर समर्थक भारतालाचा पाठिंबा देतील. अशा स्थितीत पाकिस्तानवर प्रेक्षकांचा अतिरिक्त दबावही असणार आहे.
टीम इंडियाकडे जगातील सर्वोत्तम बॅटिंग लाइनअप : कर्णधार रोहित शर्मानं दिल्लीत अफगाणिस्तानविरुद्ध शतक झळकावल्यानंतर सांगितलं होतं की, टीम इंडियाकडे असे अनेक खेळाडू आहेत जे विश्वचषकादरम्यान विरोधी संघाला अडचणीत आणू शकतात. टीम इंडियाकडे जगातील सर्वोत्तम बॅटिंग लाइनअप आहे. गोलंदाजीतही जसप्रीत बुमराह सुरुवातीच्या आणि डेथ ओव्हर्समध्ये आक्रमकता दाखवतो. त्यानं सातत्यानं चमकदार कामगिरी केली आहे. तर कुलदीप यादवही चेंडू दोन्ही दिशेनं फिरवत कमाल करतो आहे. विशेष म्हणजे, भारतीय संघानं क्षेत्ररक्षणातही सातत्यानं सुधारणा केली आहे.
गिल संघात सामील झाला : सलामीवीर शुभमन गिल संघात खेळला असता तर भारतीय संघ एक आदर्श संघ ठरला असता. गिल अहमदाबादमध्ये संघात सामील झाला असून त्यानं सुमारे तासभर नेटमध्ये फलंदाजीचा सराव केला. हा युवा फलंदाज डेंग्यूमुळे आजारी असल्यानं संघाबाहेर होता. त्याच्या अनुपस्थिती इशान किशननं चांगली फलंदाजी केली असली तरी, शुभमन गिलच्या उत्कृष्ट शॉट्स आणि प्रभावी खेळीशी त्याची तुलना होऊ शकत नाही. गिलनं आशिया कपमध्येही पाकिस्तानविरुद्ध स्फोटक खेळी खेळली होती. परिस्थितीनुसार फलंदाजी करण ही गिलची खासियत आहे.
भरपूर धावा होण्याची अपेक्षा : अहमदाबादच्या खेळपट्टीबद्दल बोलायचं झालं तर तिच्यावर भरपूर धावा होण्याची अपेक्षा आहे. या खेळपट्टीवर गोलंदाजाला अनेकदा गरमी जाणवते. पाकिस्तानच्या कर्णधारानं सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत सांगितलं होते की, 'या परिस्थितीत गोलंदाजांना चूक करण्याची संधी फार कमी आहे. या खेळपट्टीवरील बहुतेक सामने हाय स्कोअरिंग झाले आहेत. त्यामुळे मी माझ्या गोलंदाजांना योग्य लाईन आणि लेन्थवर गोलंदाजी करत राहण्यास सांगेन, असं तो म्हणाला होता.
आफ्रिदीवर पाकिस्तानची मदार : बाबर पुढे बोलताना म्हणाला की, 'या सामन्यासाठी आमच्यावर दबाव नाही. आम्ही एकमेकांसोबत अनेकदा खेळलो आहोत. आम्हाला हैदराबादमध्ये खूप पाठिंबा मिळाला. अहमदाबादमध्येही असाच पाठिंबा अपेक्षित आहे. आम्ही गोलंदाजी आणि फलंदाजीत टीम म्हणून सर्वोत्तम कामगिरी करू शकतो. आम्ही नसीमला सर्वात जास्त मिस करू. अशा विकेट्सवर तो आमच्यासाठी महत्त्वाचा गोलंदाज ठरू शकतो. पण आम्हाला आफ्रिदीवर पूर्ण विश्वास आहे, असं बाबर म्हणाला.
रविचंद्रन अश्विनला स्थान मिळेल का : या मोठ्या मैदानावर भारत कदाचित फिरकीपटू रविचंद्रन अश्विनला संघात घेण्याचा विचार करेल. टर्निंग बॉल्ससमोर पाकिस्तानी फलंदाजांची कमजोरी अनेकदा समोर आली आहे. अशा स्थितीत अश्विनला चान्स मिळण्याची शक्यता वाढते. रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि इशान किशन या खेळाडूंच्या खांद्यावर भारताची आघाडीची फलंदाजी असेल. पाकिस्तानविरुद्ध भारताला वेगवान गोलंदाज आफ्रिदीपासून धोका असेल. याचा सामना करणं भारतासाठी महत्त्वाचं ठरणार आहे.
नाणेफेक महत्त्वाची : या मैदानावर नाणेफेक महत्त्वाची ठरणार आहे. सायंकाळी दव पडण्याची शक्यता असून ढगांमुळे खेळात व्यत्यय येण्याचीही शक्यता आहे. अशा परिस्थितीत दोन्ही संघांना मैदानातील परिस्थिती लक्षात घेऊनच निर्णय घ्यावा लागेल. संघांना एक रणनीती बनवावी लागेल आणि नंतर त्याची अंमलबजावणी करावी लागेल. या विश्वचषकात भारतानं आतापर्यंतच्या चढ-उतारांसह जोरदार खेळाचं प्रदर्शन केलंय. आता शनिवारी संघाला मानसिक आणि भावनिकदृष्ट्या स्वतःवर नियंत्रण ठेवावं लागेल. रोहितचा संघ भारत-पाक सामन्यातील दडपण नियंत्रणात ठेवू शकला, तर तो बॉल आणि बॅटनं चमत्कार करताना दिसेल.
हेही वाचा :
- Cricket in Olympics : ऑलिम्पिकमध्ये १२८ वर्षांनंतर दिसणार क्रिकेटचा थरार, २०२८ च्या ऑलिम्पिकमध्ये टी-२० क्रिकेटचा समावेश
- Cricket World Cup २०२३ : विश्वचषकात रोहितची गाडी सुसाट! सर्वाधिक शतक, सर्वाधिक षटकार; जाणून घ्या किती रेकॉर्ड मोडले
- Cricket World Cup २०२३ : डेंग्यूनं ग्रस्त शुभमन गिल पाकिस्तानविरुद्ध खेळणार का? जाणून घ्या हेल्थ अपडेट