अहमदाबाद - मोटेरा येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर उद्या म्हणजेच ४ मार्चपासून भारत आणि इंग्लंड यांच्यात चौथ्या कसोटीला सुरुवात होत आहे. या मालिकेत भारताकडे २-१ अशी आघाडी आहे. त्यामुळे शेवटची कसोटी जिंकून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचण्याचे ध्येय भारतासमोर आहे. या कसोटीसाठी जसप्रीत बुमराह भारतीय संघात नसल्याने वेगवान गोलंदाज उमेश यादवला संघात स्थान मिळू शकते. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान, ३३ वर्षीय उमेश जखमी झाला होता. त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये त्याला संघात स्थान देण्यात आले नव्हते. मात्र तंदुरुस्त झाल्यानंतर तिसर्या आणि चौथ्या कसोटी सामन्यात त्याला संघात स्थान देण्यात आले आहे.
चौथ्या कसोटीपूर्वी वैयक्तिक कारणांमुळे बुमराहने न खेळण्याचा निर्णय घेतल्यानंतर उमेश यादवला शेवटच्या अकरामध्ये स्थान मिळण्याची शक्यता आहे. भारताचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे म्हणाला, की उमेश चांगली लयीत आहे. रहाणे म्हणाला, "उमेश खेळायला तयार आहे आणि त्यासाठी तो तंदुरुस्त आहे. त्याने नेट्समध्ये चांगली कामगिरी केली आहे.''
उमेशकडे रिव्हर्स स्विंग करण्याची कला आहे जी संघासाठी उपयुक्त ठरू शकते. मात्र, तिसर्या कसोटीप्रमाणे या सामन्यात फिरकी गोलंदाजांनाही खेळपट्टीकडून मदत मिळू शकते. उमेशशिवाय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजही संघात प्रवेश घेण्याच्या शर्यतीत आहे. सिराजला ऑस्ट्रेलियाविरुद्ध मैदानात उतरवण्यात आले होते. घरच्या मैदानावर उमेशची चांगली नोंद असून त्याला अंतिम अकरामधील स्थानासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे.
हेही वाचा - महान फुटबॉलपटू पेले यांनी घेतली कोरोना लस, पाहा व्हिडिओ