लंडन - इंग्लंडने न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२१मधील खेळाडूंना विश्रांती देण्याची शक्यता आहे.
२ जूनपासून लंडन येथील लॉर्ड्स मैदानावर सुरू होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंड आणि इंग्लंड एकमेकांशी भीडणार आहेत.
एका आघाडीच्या ब्रिटीश मीडिया आउटलेटच्या वृत्तानुसार, आयपीएल २०२१मध्ये खेळलेल्या खेळाडूंना कसोटी मालिकेसाठी निवडण्यात येणार नाही.
ख्रिस वॉक्स, सॅम कुर्रान, मोईन अली, जोस बटलर आणि जॉनी बेअरस्टो या इंग्लंडच्या खेळाडूंनी आयपीएल २०२१ मध्ये सहभाग घेतला होता. ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे. आता युकेमध्ये परतलेल्या प्रत्येक खेळाडूला दहा दिवस आयसोलेशनमध्ये राहणे अनिवार्य करण्यात आले आहे.
या वृत्तपत्राने असे कळवले आहे की, या शनिवारी व रविवारी आयसोलेशनचा कालावधी संपणार असून आयपीएल खेळलेल्या खेळाडूंना इंग्लंड संघात संधी देण्याची शक्यता फारच कमी आहे.
या आठवड्याच्या सुरुवातीस, इंग्लंडच्या पुरुष संघाचे व्यवस्थापकीय संचालक अॅशली जाइल्स यांनी न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी संघात काही नवीन चेहरे असण्याचे संकेत दिले आहेत.
आयपीएल पुढे ढकलल्यामुळे इंग्लंडचे सर्व खेळाडू निवडीसाठी उपलब्ध आहेत, पण जाइल्स म्हणाले की, व्यवस्थापनाला खेळाडूंना पुन्हा मैदानात उतरवण्याची कोणतीही घाई नाही.
इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात जूनमध्ये कसोटी मालिका सुरू होईल. या ऑगस्टपासून इंग्लंड आणि भारत या संघामध्ये पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. हेही वाचा - सोनू सूदचे लोकांच्या मदतीसाठी 'पुढचे पाऊल'!!