हेडिंग्ले - भारत आणि इंग्लंड यांच्यातील हेडिंग्ले कसोटी सामन्याला सुरूवात होण्याआधी यजमान संघाचा दिग्गज यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलरने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्याने इंग्लंड संघातील इतर फलंदाजांनी कर्णधार जो रुटला फलंदाजीत साथ दिली पाहिजे, असे म्हटलं आहे. बटलरच्या मते, संघातील इतर फलंदाजांनी जबाबदारी ओळखून खेळ करायला हवा.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील नॉटिंघम येथे खेळला गेलेला पहिला सामना पावसामुळे ड्रॉ राहिला. यानंतर दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने दमदार कामगिरी करत हा सामना 151 धावांनी जिंकला आणि पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. पण झालेल्या दोन सामन्यात जो रुट वगळता इंग्लंडचे इतर फलंदाज फ्लॉप ठरले. यामुळे त्यांना दुसऱ्या सामन्यात पराभव पत्कारावा लागला.
उभय संघात आजपासून हेडिंग्ले येथे तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरूवात होत आहे. या सामन्याआधी यष्टीरक्षक जोस बटलर म्हणाला की, 'संघातील इतर फलंदाजांना जबाबदारी घ्यावी लागेल आणि कर्णधार जो रुटला सपोर्ट करावं लागेल.'
जो रुट नेहमी जबरदस्त फलंदाजी करतो. या वर्षी तो करियमधील सर्वोत्तम फॉर्मात आहे. भारताविरुद्धच्या मालिकेत देखील त्याने शानदार सुरूवात केली. आशा आहे की त्याचा हा फॉर्म पुढे देखील कायम राहील. तसेच तो आमच्या परफॉर्मेंस सुधारण्यासाठी मदत करेल. आमची अजिबात इच्छा नाही की, सर्व जबाबदारी त्यांच्या खांद्यावर असावी, असे देखील जोस बटलरने म्हटलं आहे.
दरम्यान, आजपासून सुरू होत असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात विजय मिळवून इंग्लंडचा संघ मालिकेत बरोबरी साधण्याच्या प्रयत्नात आहे. पण जो रुट वगळता इंग्लंडचे इतर फलंदाज मोठी खेळी करण्यात अपयशी ठरत आहेत. यामुळे यजमान संघाची डोकेदुखी वाढली आहे. अशात तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंड आपल्या संघात मोठे बदल करू शकतो.
हेही वाचा - 'इंग्लंडमध्ये फलंदाजी सोप्पी नाही, धावा करण्यासाठी ईगो पॉकेटमध्ये ठेऊन मैदानात उतरण्याची गरज'
हेही वाचा - ENG vs IND: डेविड मलानने विराट कोहलीसह भारतीय गोलंदाजांचे केलं तोंडभरून कौतुक