हेडिंग्ले - भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंड संघात स्थान मिळालेल्या फलंदाजाने भारतीय संघाचे तोंडभरून कौतुक केले आहे. इंग्लंडचा फलंदाज डेविड मलान कर्णधार विराट कोहलीसह भारतीय गोलंदाजांचा फॅन झाला आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघ कोणत्याही परिस्थितीमध्ये कसोटी सामना जिंकण्याची क्षमता ठेवतो, असे मलानने म्हटलं आहे. दरम्यान, उद्या बुधवारपासून उभय संघातील तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरूवात होणार आहे. भारतीय संघ लॉर्डस् मध्ये खेळवण्यात आलेला दुसरा कसोटी सामना 151 धावांनी जिंकत मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे.
डेविड मलान पत्रकार परिषदेत म्हणाला की, 'भारतीय संघाचे नेतृत्व शानदार पद्धतीने करण्यात आले आहे, असे मला वाटते. विराट कोहली ज्या पद्धतीने काम करतो, ते पाहता त्यांच्यात भावना दिसते आणि तुम्ही जाणता की, तो लोकांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरतो.'
फलंदाजीसोबत भारताची गोलंदाजी खोलवर आहे. भारताकडे असे गोलंदाज आहेत जे कोणत्याही परिस्थितीमध्ये कसोटी सामना जिंकू शकतात. भारतीय संघाकडे अनेक पर्याय आहेत आणि ते शानदार प्रतिस्पर्धी आहेत, असे देखील डेविड मलान म्हणाला.
डेविड मलानने 2018 मध्ये बर्मिंघम येथे भारताविरुद्ध कसोटी सामना खेळला होता. त्याने 2017 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध डेब्यू करताना 15 सामन्यात 724 धावा केल्या आहेत. 2018 नंतर तीन वर्षांनी डेविड मलानची इंग्लंड संघात वापसी झाली आहे.
तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीविषयी डेविड मलान म्हणाला की, 'वास्तवात कसोटी क्रिकेटमध्ये मी या क्रमाकांवर जास्त फलंदाजी केलेली नाही. मी 25-30 वेळा या क्रमाकांवर खेळलो आहे. मी माझ्या नैसर्गिक पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न करतो.'
दरम्यान, डेविड मलान टी-20 क्रिकेटमधील अव्वल फलंदाज आहे. नुकतीच पार पडलेल्या द हंड्रेड स्पर्धेत तो खेळला आहे. यात त्याने 9 सामन्यात 26.75 च्या सरासरीने 214 धावा केल्या आहेत. यात 3 अर्धशतकांचा समावेश आहे. इंग्लंडचा संघ डेविड मलानकडून कसोटी मालिकेत चांगल्या कामगिरीची अपेक्षा करत आहे.
हेही वाचा - 'इंग्लंडमध्ये फलंदाजी सोप्पी नाही, धावा करण्यासाठी ईगो पॉकेटमध्ये ठेऊन मैदानात उतरण्याची गरज'
हेही वाचा - 'भारताच्या बाजूने बोलणाऱ्या रमीज राजांना पीसीबी अध्यक्ष करू नका'