लंडन - भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना निर्णायक अवस्थेत पोहोचला आहे. भारताने चौथ्या दिवसाअखेर 6 बाद 181 धावा केल्या आहेत. भारताकडे 154 धावांची आघाडी झाली आहे. अंधूक सूर्य प्रकाशामुळे चौथ्या दिवशी खेळ लवकर थांबवण्यात आला तेव्हा ऋषभ पंत 14 आणि इशांत शर्मा 4 धावांवर खेळत होता.
के. एल. राहुल आणि रोहित शर्मा या जोडीला दुसऱ्या डावात मोठी सलामी देता आली नाही. मार्क वूडने राहुलला (5) बाद करत भारताला पहिला धक्का दिला. उजव्या यष्टीबाहेर जाणाऱ्या चेंडूवर राहुलच्या बॅटची कड घेऊन तो यष्टीरक्षक जोस बटलरच्या हातामध्ये विसावला. दुसरीकडे रोहित शर्माने (21) डावाला आत्मविश्वासाने प्रारंभ केला. त्याने मार्क वूडच्या पुढच्याच षटकात षटकार खेचला. परंतु अखेरच्या चेंडूवर नियंत्रित फटका खेळण्यात तो अपयशी ठरला.
भारतीय कर्णधार विराट कोहलीकडून भारताला मोठ्या खेळीची अपेक्षा होती. परंतु ती अपेक्षा फोल ठरली. सॅम कुरेनच्या उजव्या यष्टीवरील चेंडूवर तो जोस बटलरकरवी झेल बाद झाला. त्याने 20 धावा केल्या आणि उपाहारापर्यंत भारताची अवस्था 3 बाद 56 अशी झाली.
भारताची अनुभवी जोडी चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांनी दुसरे सत्रात संयमी फलंदाजी केली. या दोघांनी चौथ्या गड्यासाठी 100 धावांची भागिदारी केली. पण मार्क वूडने पुजाराला बाद करून ही जोडी फोडली. पाठोपाठ अजिंक्य रहाणे आणि रविंद्र जडेजा (3) फिरकीपटू मोईन अलीच्या जाळ्यात अडकले.
आघाडीचे तीन फलंदाज 55 धावांत माघारी परतले होते. तेव्हा चेतेश्वर पुजारा (45 धावा) आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे (61) यांनी चिवट झुंज देत भारताचा डाव सावरला. परंतु अखेरच्या सत्रात या दोघांसह रविंद्र जडेजासुद्धा बाद झाला. यामुळे भारतीय संघ संकटात सापडला. अंधूक सूर्य प्रकाशामुळे चौथ्या दिवशी खेळ लवकर थांबवण्यात आला तेव्हा ऋषभ पंत १४ आणि इशांत शर्मा ४ धावांवर खेळत होता.
संक्षिप्त धावफलक
- भारत (पहिला डाव) : ३६४
- इंग्लंड (पहिला डाव) : ३९१
- भारत (दुसरा डाव) : ८२ षटकांत ६ बाद १८१ (अजिंक्य रहाणे ६१, चेतेश्वर पुजारा ४५, ऋषभ पंत १४ धावांवर खेळत आहे; मार्क वूड ३/४०)