नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघाने कसोटी मालिकेत इंग्लंडला ३-१ने पराभूत केले आणि आयसीसीच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले. आता या स्पर्धेचे विजेतेपद मिळवण्यासाठी भारत न्यूझीलंडशी स्पर्धा करेल. या स्पर्धेचा अंतिम सामना लॉर्ड्सवर रंगणार होता. मात्र, आता यात बदल करण्यात आला आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुलीने या स्पर्धेच्या अंतिम सामन्याचे स्थान जाहीर केले. आता हा सामना साउथम्प्टनच्या एजेस बाउल मैदानावर खेळला जाईल. कोरोनाच्या उद्रेकामुळे लॉर्ड्सवरचा सामना हलवण्यात आला असल्याचे समोर आले आहे. १८ जुनला या सामन्याची सुरुवात होईल.
गांगुलीने सांगितले, ''मी साउथम्प्टन येथे भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळल्या जाणार्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलची वाट पाहत आहे. या प्रकरणाचा निर्णय खूप पूर्वी घेण्यात आला आहे.''
ऑस्ट्रेलिया संघाने कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून माघार घेतली. यामुळे उभय संघातील कसोटी मालिका रद्द करावी लागली. त्याचा फटका ऑस्ट्रेलिया संघालाच बसला. आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी भारत-इंग्लंड यांच्यातील मालिका निकालावर दुसरा संघ ठरणार होता. न्यूझीलंडने आधीच अंतिम सामन्यात प्रवेश केल्यामुळे दुसऱ्या स्थानासाठी भारत, इंग्लंड यांच्यासोबत ऑस्ट्रेलियाचा संघ देखील शर्यतीत होता. पण, ऑस्ट्रेलियाला अंतिम सामन्याचे तिकीट मिळवण्यासाठी भारत-इंग्लंड मालिकेच्या निकालावर अवलंबून राहवे लागले होते. पण, भारतीय संघाने चौथी कसोटी सामन्यासह मालिका जिंकून ऑस्ट्रेलियालाही स्पर्धेतून बाहेर फेकले.
हेही वाचा - विजय हजारे ट्रॉफी : मुंबई उपांत्य फेरीत, पृथ्वीची तडाखेबंद खेळी