नवी दिल्ली - भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला हरवून विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील पहिलाच विजय मिळवला. या सामन्यामध्ये धोनीने वापरलेल्या बलिदान चिन्हाच्या ग्लोव्ह्जचा वाद मोठ्या प्रमाणावर चर्चेत आला होता. यानंतर, आयसीसीने बीसीसीआयल धोनीच्या ग्लोव्ह्जवरील चिन्ह हटवायला सांगितले होते.
या वादामध्ये अनेक लोकांच्या प्रतिक्रीया उमटल्या होत्या. या प्रकरणावर आता भारताचा माजी स्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवागने ट्विटरच्या माध्यमातून मत व्यक्त केले आहे. "आयसीसीची परवानगी घेऊन धोनीने ग्लोव्ह्जऐवजी बॅटवर बलिदान चिन्ह लावले पाहिजे होते." असे सेहवागने म्हटले आहे.
सेहवाग पुढे म्हणाला, "आयसीसीच्या परवानगीने धोनी त्याच्या बॅटवर दोन लोगो लावू शकतो. ज्यामध्ये एक लोगो बलिदान बॅचचा असू शकतो. लिखीत परवानगीशिवाय धोनीने हे करायला नको होते असे आयसीसीने बीसीसीआयला सांगितले आहे. आयसीसी आणि धोनी आपल्या जागेवर बरोबर आहेत. लिखीत परवानगी घेऊन धोनी बॅटवर बलिदान चिन्ह लावू शकतो. कोणताही खेळाडू आपल्या बॅटवर एक उत्पादकाचा आणि दुसरा कोणताही असे दोन लोगो लावू शकतात. आयसीसीची परवानगी घेऊन मीसुद्धा माझ्या शाळेचा लोगो बॅटवर लावला होता."