टाँटन - विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील पहिल्या विजयासाठी आज अफगाणिस्तान न्यूझीलंडबरोबर टाँटनच्या कौंटी मैदानावर भिडेल. तर दुसरीकडे सलग दोन सामन्यांमध्ये विजय मिळवल्यानंतर हॅट्ट्रिक साधण्यासाठी न्यूझीलंडचा संघ उत्सुक आहे. हा सामना सायंकाळी ६ वाजता सुरू होईल.
अफगाणिस्तानला सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांत जरी पराभव स्वीकारावा लागला असला तरी संघाने केलेल्या झुंजार कामगिरीचे क्रिकेटविश्वात कौतूक होत आहे. मात्र, या सामन्यापूर्वी अफगाणिस्तानच्या संघाला एका मोठा धक्का लागला आहे. अफगाणिस्ताचा स्फोटक आणि सलामीचा फलंदाज मोहम्मद शहजाद विश्वकरंडक स्पर्धेतून बाहेर फेकला गेला आहे. गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे तो उरलेल्या सर्व सामन्यांना तो मुकणार आहे. त्यामुळे यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद शहजादच्या जागी अफगाणिस्तानच्या संघात इकराम अली खिलचा समावेश केला आहे.
केनिंग्टन ओव्हल मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यात न्यूझीलंडने बांगलादेशवर २ गडी राखून विजय मिळवला. या विजयासह न्यूझीलंडच्या संघाने विश्वकरंडक स्पर्धेच्या गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. या स्पर्धेत आतापर्यंत न्यूझीलंडने २ सामने खेळले असून त्यातील दोन्ही सामने जिंकण्यास त्यांना यश आले आहे.
न्यूझीलंडचा संघ असा -
केन विल्यमसन (कर्णधार), मार्टिन गुप्टील, रॉस टेलर, ट्रेंट बोल्ट, डी ग्रँडहोमे, लॉकी फर्ग्यूसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम, कॉलिन मुनरो, जिमी निशाम, हेन्री निकोलस, मिशेल सँटेनर, ईश सोधी, टीम साऊदी, टॉम ब्लंडेल.
अफगाणिस्तानचा संघ असा -
गुलाबदीन नाईब (कर्णधार), मोहम्मद शहजाद, नूर अली झादरान, हजरतुल्लाह जजाई, रहमत शाह, असघर अफगाण, हशमतुल्लाह शाहीदी, नजीबुल्लाह झादरान, समिउल्लाह शिनवारी, मोहम्मद नबी, राशिद खान, दौलत झादरान, आफताब आलम, हामिद हसन, मुजीब उर रहमान.