नवी दिल्ली - आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने बांगलादेशचा ४८ धावांनी पराभव केला. या सामन्यात डेव्हिड वॉर्नरने बांगलादेशच्या गोलंदाजीचे पिसे काढत १४७ चेंडूत १६६ धावा चोपल्या. त्याने या खेळीत १४ चौकारांसह ५ षटकार लगावले. या स्पर्धेत फॉर्मात असलेला वॉर्नर भारताचा हिटमॅन रोहित शर्माचा एक रेकॉर्ड मोडू शकतो.
भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर रोहित शर्मा सध्या भन्नाट फॉर्मात आहे. रोहित शर्मा याने आतापर्यंत एकदिवसीय सामन्यात सात वेळा दीडशे पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. मात्र बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नर याने सहाव्यांदा १५० पेक्षा जास्त धावांची खेळी केली. त्यामुळे रोहित शर्माचा हा रेकॉर्ड वॉर्नर मोडतो का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विश्वकरंडक स्पर्धेत रोहितने आतापर्यंत २ शतकांसह ३१९ धावा केल्या आहेत. यात त्याने केलेल्या १४४ धावांच्या पाकिस्तानविरूद्ध करण्यात आलेल्या खेळीचा समावेश आहे. एकदिवसीय सामन्यात एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम हा रोहित शर्मा याच्या नावावर होता परंतू, याच स्पर्धेत इंग्लंडचा कर्णधार इयाम मॉर्गनने हा विक्रम मोडला.