लंडन - आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेत आज दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान संघात सामना सुरू आहे. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. या सामन्यामध्ये आफ्रिकेचा फिरकीपटू इम्रान ताहिरने पाकिस्तानच्या इमान-उल-हकला बाद करत एक विक्रम रचला आहे.
४० वर्षीय ताहिर हा विश्वकंरडकात आफ्रिकेचा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. २१ व्या षटकात त्याने इमान-उल-हकला ४४ धावांवर बाद केले. ताहिरने विश्वचषकात आफ्रिकेकडून ३८ विकेट घेणाऱया अॅलन डोनाल्डचा विक्रम मोडला आहे. विश्वकंरडकात आता ताहिरच्या नावावर ३९ बळी झाले आहेत.
अॅलन डोनाल्ड यांनी २५ सामन्यांत ३८ बळी घेतले होते. तर, ताहिरने फक्त २० सामन्यांमध्ये ३९ बळी घेतले आहेत. यंदाच्या विश्वकंरडकात दक्षिण आफ्रिकाने ६ पैकी ४ सामने गमावले आहेत. गुणतालिकेत आफ्रिका आठव्या स्थानी आहे.