लंडन - सलामीच्याच लढतीमध्ये यजमान इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत आपले इरादे स्पष्ट केले आहेत. या लढतीमध्ये इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेचा डाव २०७ धावांवर संपुष्टात आणला. या सामन्यात अष्टपैलू बेन स्टोक्सने दमदार प्रदर्शन करत संघाला विजय मिळवून दिला. शिवाय सामनावीराचा मानही पटकावला. यावेळी स्टोक्सने एक अफलातून झेल घेतला.
![ben stokes](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/3431496_ben.jpg)
या सामन्यात इंग्लंडचा फिरकीपटू आदिल रशीद ३५ वे षटक टाकत होता. या षटकातल्या एका चेंडूवर आफ्रिकेच्या एँडिल फेलुकवायोने हवेत फटका मारला. त्यावेळी सीमारेषाकडे असणाऱ्या बेन स्टोक्सने हवेत उंच उडी मारून झेल घेतला. हा झेल इतका भन्नाट होता की तो झेल पाहून काही काळ प्रेक्षकही थक्क झाले होते.
विश्वकरंडक स्पर्धेच्या एका सामन्यात अर्धशतक, दोन विकेट आणि दोन झेल टीपणारा स्टोक्स हा चौथा खेळाडू ठरला आहे.