सिडनी - आयसीसी महिला टी-२० विश्वकरंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत इंग्लंडला आपला गाशा गुंडाळावा लागला. भारताविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला आणि इंग्लंडचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. गट फेरीतील गुणांच्या आधारे भारत अंतिम फेरीत पोहोचला. दरम्यान इंग्लंडला गट फेरीतील एक पराभव महागात पडला. या पराभवामुळेच इंग्लंडचे अंतिम फेरीचे स्वप्न भंगले.
यंदाच्या विश्वकरंडकामध्ये ऑस्ट्रेलिया सोबत इंग्लंडचा संघ देखील विजेतेपदाचा दावेदार होता. पण 'ब' गटात त्यांना आपल्या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ६ गडी राखून धूळ चारली. त्यानंतर इंग्लंडने सलग तीन सामने जिंकत उपांत्य फेरीत गाठली.
इंग्लंड 'ब' गटात ६ गुणांसह दुसऱ्या स्थानावर राहिला. तर या गटात आफ्रिकेने ३ सामने जिंकले आणि त्यांचा अखेरचा सामना पावसामुळे रद्द झाला. यामुळे त्याने एक गुण मिळाला. ते 'ब' गटात ७ गुणांसह पहिल्या स्थानावर राहिले. दुसरीकडे 'अ' गटात भारतीय संघाने चारही सामने जिंकत ८ गुणांसह पहिले स्थान पटकावले होते.
दरम्यान सामना रद्द झाल्यानंतर इंग्लंडची कर्णधार हिथर नाइटने नाराजी व्यक्त केली. ती म्हणाली, 'हे खूप निराशाजनक आहे. अशा प्रकारे आम्हाला विश्वकरंडक स्पर्धेचा निरोप घ्यायचा नव्हता. राखीव दिवस असता तर बरं झालं असतं. दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा तो पराभव आम्हाला महागात पडला.'
हेही वाचा - Women's T20 WC : आम्हाला तुमचा अभिमान... दिग्गजांकडून टीम इंडियावर शुभेच्छा वर्षाव
हेही वाचा - अंतिम फेरीत पोहोचल्यानंतरही कर्णधार हरमनप्रीत नाखूश , म्हणाली...