पोर्ट ऑफ स्पेन - कोरोना विषाणूच्या धोक्यामुळे जगभरातील अनेक क्रीडा स्पर्धांवर टांगती तलवार आहे. अशात वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाने इंग्लंड संघासाठी दरियादिली दाखवली आहे. त्यांनी वेस्ट इंडीजमध्ये क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करा, अशी ऑफर केली आहे.
झाले असे की, जून महिन्यात वेस्ट इंडीजचा संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. उभय संघात कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. पण, या मालिकेवर कोरोनाचे सावट आहे. यामुळे ही मालिका विंडीजने आपल्या देशात खेळवा, असे सांगितलं आहे.
![West Indies Offer To Host England-Pakistan Test Series Amid Coronavirus Pandemic](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/6466147_eeeee.jpg)
विंडीजने या ऑफरसह इंग्लंडला आणखी एक ऑफर केली आहे. त्यांनी इंग्लंड-पाकिस्तान यांच्यातील कसोटी मालिकाही आपल्या देशात खेळवण्यास हरकत नसल्याचे म्हटलं आहे. याचे यजमानपद हे इंग्लंडकडे राहिल, असे विडींजने स्पष्ट केलं आहे. इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात ३ सामन्याची कसोटी मालिका ३० जुलैपासून आयोजित आहे.
वेस्ट इंडीजचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉनी ग्रेव यांनी सांगितलं की, 'आम्ही वेस्ट इंडीजमध्ये मालिकेचे आयोजन करण्यासंदर्भातील प्रस्ताव इंग्लंड बोर्डासमोर ठेवला आहे. याविषयी चर्चा सुरू आहेत.'
दरम्यान, चीनच्या वुहान शहरातून जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूमुळे ८ हजाराहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. जगातील १५० हून अधिक देशांमध्ये या विषाणूचा फैलाव झाला आहे. जगभरात दीड लाखांहून अधिक लोकांना यांची लागण झाली आहे. इंग्लंडमध्येही कोरोनामुळे १०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. पण, इंग्लंडच्या तुलनेत वेस्ट इंडीजमध्ये कोरोनाचा फैलाव झालेला नाही. यामुळे विंडीजने इंग्लंडला ऑफर केली आहे.
हेही वाचा - 'पाक खेळाडूंची टीम इंडियात खेळण्याची लायकी नाही, धावा न केल्यास फलंदाजाला फुकटात राबवा'
हेही वाचा -पाकिस्तान सुपर लीग : 'त्या' १२८ जणांची कोरोना चाचणी, समोर आला अहवाल