लंडन - वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने सोमवारी इंग्लंडमध्ये 14 दिवसांचा आयसोलेशन कालावधी पूर्ण केला आहे. आता हा संघ 8 जूनला होणाऱ्या कसोटी मालिकेच्या तयारीला सुरुवात करणार आहे. यासाठी विंडीजचा संघ मँचेस्टर येथे तीन दिवसीय सराव सामना खेळेल.
9 जून रोजी ब्रिटनमध्ये आगमन झाल्यापासून वेस्ट इंडीजचा संघ मॅंचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदानाजवळील हॉटेलमध्ये क्वारंटाईनमध्ये आहे. मीडियाच्या वृत्तानुसार, वेस्ट इंडीजचा संघ मंगळवारी पहिला सराव सामना खेळेल. त्याच वेळी, इंग्लंडचा 30 सदस्यीय प्रशिक्षण गट कोरोनाची चाचणी करण्यासाठी साऊथम्टन येथे जमा होईल. टीम मॅनेजमेंटही त्यांच्यासोबत असेल.
या कालावधीत, इंग्लंडचा संघ मैदानातील हॉटेलमध्ये एकांतात राहणार आहे. संघाच्या सरावाचा पहिला दिवस गुरुवारी असेल. यात अर्धे खेळाडू सकाळी आणि उर्वरित खेळाडू दुपारी सराव करतील. इंग्लंड आपला तीन दिवसीय सराव सामना 1 जुलैपासून खेळणार आहे. त्यानंतर, पहिल्या कसोटीसाठी संघ जाहीर केला जाईल.
कोरोना व्हायरसचा प्रसार झाल्यानंतर प्रथमच क्रिकेट सुरू होणार असून परदेशी दौर्यावर जाणारा वेस्ट इंडीज हा पहिला संघ ठरला आहे.
उभय संघात तीन कसोटी सामने विनाप्रेक्षक खेळण्यात येणार आहेत. पहिला सामना 8 जुलैला साऊथम्पटन येथे खेळला जाईल. दुसरा 16 ते 20 जुलै दरम्यान आणि तिसरा 24 ते 28 जुलै या काळात खेळवण्यात येणार आहे. हे दोन्ही सामने ओल्ड ट्रँफर्ड मैदानात खेळले जाणार आहेत. दरम्यान, खेळाडूंची राहण्याची व्यवस्था स्टेडियममध्ये किंवा त्यांच्या जवळपास असलेल्या हॉटेलमध्ये करण्यात येणार आहे.