बर्मिंगहॅम - आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात यजमान इंग्लंडने कट्टर प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियाचा ८ गडी राखून एकतर्फी पराभव केला. ऑस्ट्रेलियाच्या पराभवामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटला नवीन विश्वविजेता मिळणार हे आता नक्की झाले आहे. विश्वकरंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत इंग्लंडची गाठ न्यूझीलंडशी होणार आहे.
ऑस्ट्रेलियाचे २२४ धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या इंग्लंडच्या सलामीवीर जॉनी बेअरस्टो आणि जेसन रॉय यांनी आक्रमक फलंदाजी केली. जेसन रॉयने ८५ तर जॉनी बेअरस्टोने ३४ धावा केल्या. हे दोन्ही फलंदाज माघारी परतल्यानंतर जो रुट आणि कर्णधार इयॉन मॉर्गन यांनी संयमीपणे फलंदाजी करत इंग्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. इंग्लंडच्या फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेले २२४ धावांचे आव्हान सहज पूर्ण केले.
त्यापूर्वी ऑस्ट्रेलियाने, स्टीव्ह स्मिथच्या ८५ आणि अॅलेक्स केरीच्या ४६ धावांच्या जोरावर यजमान इंग्लंडसमोर २२४ धावाचे आव्हान ठेवले होते. नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय ऑस्ट्रेलियाला अंगलट आला. ६.१ षटकात ३ बाद १४ अशी अवस्था ऑस्ट्रेलिया संघाची झाली. तेव्हा स्टीव्ह स्मिथ आणि अॅलेक्स कॅरीने ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला.
स्मिथ आणि केरी या दोघांनी शतकी भागिदारी करत संघाला शंभरीपार केले. केरी ४६ धावांवर असताना आदिल रशिदने आपल्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक जेम्स व्हिन्सकरवी त्याला झेलबाद केले. या धक्क्यानंतर मैदानात आलेल्या स्टोनिसला अदिल रशिदने पायचित करुन खाते न खोलताच परत पाठवले. मैदानात जमलेला स्टीव्ह स्मिथ आणि ग्लेन मॅक्सवेलने भागिदारी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, जोप्रा आर्चरने मॅक्सवेलला मॉर्गनकरवी झेलबाद केले.
मॅक्सवेल बाद झाल्यानंतर पॅट कमिन्स मैदानात आला. त्याने व्यक्तीगत ६ धावांची भर घातली आणि संघाची धावसंख्या ३७.४ षटकात १६६ असताना तो बाद झाला. त्याला आदिल रशिदने रुटकरवी झेलबाद केले. एका बाजूने विकेट जात असताना, दुसरी बाजू स्मिथने पकडून ठेवत अर्धशतक झळकावले. त्याला साथ मिचेल स्टार्कने २९ धावा काढून दिली. स्मिथ आणि स्टार्कच्या जोडीने ऑस्ट्रेलियाच्या संघाला दोनशे पार केले. तेव्हा धावगती वाढवण्याच्या नादात स्मिथ धावबाद झाला. स्मिथ बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा डाव २२३ धावांवर आटोपला. ख्रिस वोक्स आणि आदिल रशिदने ३-३ तर जोफ्रा आर्चरने २ आणि मार्क वूडने १ गडी बाद केला.