पर्थ - या वर्षाच्या अखेरीस भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्याचे यजमानपद न मिळाल्यामुळे वेस्टर्न ऑस्ट्रेलिया क्रिकेट असोसिएशनचे (वाका) अध्यक्ष तुक वेल्डन यांनी नाराजी व्यक्त केली आहे. वाकाकडे दुर्लक्ष करून पर्थ स्टेडियमवर कसोटी सामन्याचे यजमानपद सोपवण्यात आले आहे. भारतीय संघ या वर्षाच्या अखेरीस ऑस्ट्रेलिया दौर्यावर येणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे.
एका वृत्तानुसार वेल्डन यांनी पर्थमध्ये पत्रकारांना सांगितले, "या निर्णयामुळे मी खरोखर निराश झालो आहे. मला वाटते की हा चुकीचा निर्णय आहे. त्यांनी असा निर्णय का घेतला हे मला समजू शकले नाही."
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, उभय संघातील पहिला कसोटी सामन्याला 3 डिसेंबरपासून सुरुवात होईल. हा सामना ब्रिस्बेन येथे होणार आहे. त्यानंतर 11 डिसेंबरला अॅडलेड येथे दुसरा, 26 डिसेंबरला मेलबर्न येथे तिसरा आणि 3 जानेवारी 2021 मध्ये सिडनी येथे चौथा कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे.
भारतीय क्रिकेट संघ विदेशी खेळपट्टीवर आपला पहिला 'डे-नाईट' कसोटी सामना खेळणार आहे. सिडनी क्रिकेट मैदानावर (एससीजी) 3 ते 7 जानेवारी 2021 ला हा सामना रंगणार आहे.