नवी दिल्ली - यंदाच्या आयपीएलसाठी मुख्य प्रायोजक म्हणून विवो कायम राहणार आहे. रविवारी पार पडलेल्या आयपीएलच्या गव्हर्निंग काऊन्सिलच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
भारत आणि चीन यांच्यात सध्या वाद सुरू आहे. परंतु कायदेशीर संघाशी सल्लामसलत करून आणि प्रायोजक करार डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेण्यात आला आहे.
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, ''या विषयावर चर्चा झाली आणि विवो बरोबरचा करार कायम राहील, असा निर्णय घेण्यात आला आहे. प्रायोजकत्व कराराचा विचार करून आणि या संदर्भात कायदेशीर सल्ला घेतल्यानंतर बीसीसीआयने हा निर्णय घेतला आहे.''
"आमच्या सैनिकांना ठार मारणाऱ्या सीमा संघर्षासंदर्भात आयपीएलच्या गव्हर्निंग काऊन्सिलने पुढील आठवड्यात आयपीएलच्या प्रायोजित कराराचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावली आहे", असे बीसीसीआयने 19 जून रोजी ट्विट केले होते.
गलवान खोऱ्यात भारत आणि चीन यांच्यात झालेल्या चकमकीनंतर बीसीसीआयचे हे ट्विट समोर आले होते. या चकमकीत भारतीय सैनिक शहीद झाले होते. आयपीएलच्या तेराव्या हंगामांचा रस्ता अखेर मोकळा झाला असून केंद्र सरकारने भारतीय खेळाडूंना युएई प्रवासाची परवानगी दिली आहे. 19 सप्टेंबरपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. मात्र, स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या वेळापत्रकात काही बदल करण्यात आला असून आता नव्या वेळापत्रकानुसार आयपीएल 2020 चा अंतिम सामना 10 नोव्हेंबर रोजी खेळवला जाईल.