किंग्स्टन - विंडीज आणि टीम इंडिया या संघात अखेरचा कसोटी सामना खेळवला जात आहे. सबीना पार्क येथे सुरु असलेल्या सामन्यात भारताने पहिल्या दिवसअखेर ५ बाद २६४ धावा केल्या आहेत. हा सामना सुरू होण्यापूर्वी विंडीजचे महान माजी फलंदाज सर विवियन रिचर्ड्स यांची तब्येत बिघडली.
भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यानच्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वीच्या लाईव्ह प्री शो दरम्यान रिचर्ड्स यांची तब्येत बिघडली. ब्रॉडकास्टर्ससोबत रिचर्ड्स सामन्यापूर्वी विश्लेषण करत होते. त्यांनी प्रकृती अस्वस्थ वाटत असल्याचे सामन्याआधी कळवले होते.
त्यानंतर रिचर्ड्स यांच्यासाठी मैदानात स्ट्रेचर मागवले गेले. मात्र, रिचर्ड्स दोन स्वयंसेवकाच्या मदतीने मैदानाबाहेर निघून गेले. त्यांच्या प्रकृतीविषयीची अधिक माहिती मात्र मिळू शकलेली नाही. कर्णधार विराट कोहली आणि सलामीवीर मयंक अग्रवाल यांच्या खेळीच्या जोरावर भारताने पहिल्या दिवसअखेर अडीचशे धावांचा टप्पा ओलांडला आहे.
भारताकडून सलामीवीर लोकेश राहुल आणि मयंक अग्रवाल यांनी सावध सुरुवात केली होती. भारताला ३२ धावांवर राहुलच्या स्वरुपात पहिला धक्का बसला. त्यानंतर पदार्पणवीर रकहीम कोर्नवॉलने भरवशाच्या चेतेश्वर पुजाराला झटपट ६ धावांवर बाद करत आपला पहिला बळी मिळवला. हे दोन्ही फलंदाज बाद झाल्यावर कर्णधार विराट कोहली आणि मयंकने डाव सावरला. मयंकने वैयक्तिक तिसरे अर्धशतक साकारत ५५ धावा केल्या. तर कोहलीने ७६ धावा केल्या.