नवी दिल्ली - भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या 'फुल्ल फार्मात' आहे. तो आपल्या फलंदाजीने प्रत्येक सामन्यागणिक नवनविन विक्रमांची नोंद करताना दिसत आहे. त्याने आतापर्यंत इतर खेळाडूंसह क्रिकेटविश्वात नावाजलेल्या सचिन तेंडुलकरचे अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. दिवसेंदिवस कोहलीची धावांची भूक वाढत आहे. यामुळे तो अनेक विक्रम आपल्या नावे करेल, असे क्रिकेट तज्ञांचे मत आहे. पण, कोहलीला तेंडुलकरने केलेला एक विक्रम कधीच मोडता येणार नाही, असा दावा भारताचा माजी स्फोटक सलामीवीर विरेंद्र सेहवागने केला आहे.
एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत विरेंद्र सेहवाग म्हणाला, 'आज घडीला विराट कोहली जगातील सर्वोत्तम फलंदाज आहे. सध्या तो फुल्ल फार्मात असून त्याच्या बॅटमधून खोऱ्याने धावा निघत आहे. त्याची धावाची भूक पाहता तो अनेक जागतिक विक्रमांना गवसणी घालेल. तसेच तो सचिनचे अधिकाधिक विक्रमही मोडेल. मात्र, सचिन तेंडुलकरचा एक विक्रम जो विराटसह कोणीच मोडू शकत नाही. तो म्हणजे २०० कसोटी सामने खेळण्याचा. मला नाही वाटत की विराट हा विक्रम मोडू शकेल.'
दरम्यान, विराट कोहलीच्या कामगिरीची आकडेवारी पाहिल्यास, विराटने २३९ एकदिवसीय क्रिकेटमध्ये ६०.३१ च्या सरासरीने ११५२० धावा केल्या आहेत. यात तो सचिनच्या ४९ शतकांच्या विक्रमापासून ७ शतके दूर आहे. तसेच विराटला सचिनच्या १८४२६ धावांचा विक्रम मोडण्याचीही संधी आहे. मात्र, विराट कोहलीने वेस्ट इंडीज मालिकेपूर्वी ७७ सामने खेळले आहेत. तर सचिनचा रेकार्ड पाहता त्याने २०० कसोटी सामने खेळले आहेत. यात सचिनने ५३.७९ च्या सरासराने १५९२१ धावा केल्या आहेत.