मुंबई - भारताच्या क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली स्वत:च्या बायोपिकमध्ये मुख्य भूमिका साकरण्यास तयार आहे. पण विराटने या भूमिकेसाठी एक अट घातली आहे. ''माझी पत्नी अनुष्का शर्मासुद्धा या चित्रपटात काम करणार असेल तर मी हा चित्रपट करेन'', असे विराटने म्हटले.
भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीसोबत इन्स्टाग्रामवरील संवादात विराटने ही प्रतिक्रिया दिली. या संभाषणादरम्यान विराटने आपल्या आयुष्याशी संबंधित अनेक विषयांवर भाष्य केले. विराट म्हणाला, ''आज मी जो आहे. त्याचे बरेच श्रेय अनुष्काला जाते. मी नेहमी असा नव्हतो. माझा विश्वास आहे की, प्रत्येक माणसामध्ये प्रेम शेअर करण्याची आवड असते. पण अशी एक व्यक्ती असते, जी तुम्हाला बरेच काही देऊन जाते.''
अनुष्काने मला याची जाणीव करून दिली की मी कोणत्या पदावर आहे. मला स्वत:मध्ये चांगले बदल करणे आवश्यक आहे, असे सांगून विराट म्हणाला, कोणी माझ्याकडे एखाद्या समस्येने आला असेल आणि जर माझ्याकडे मदतीची क्षमता असेल तर मी नेहमीच मदत करेन.''
विरूष्काची लव्हस्टोरी -
अनुष्का आणि विराटची लव्हस्टोरी 2013 मध्ये सुरू झाली होती. यशाच्या शिखरावर असलेल्या अनुष्का आणि विराटला एका कंपनीने जाहीरातीसाठी एकत्र कास्ट केले होते. असे म्हणतात की, दोघांची मैत्री इथूनच सुरू झाली. पुढे हीच मैत्री हळूहळू प्रेमात रुपांतरित झाली. तेव्हापासून दोघांच्या नात्याविषयी चर्चा रंगू लागल्या. दोघांच्या नात्यावर शिक्कामोर्तब तेव्हा झाले, जेव्हा जानेवारी 2014मध्ये दक्षिण आफ्रिका दौरा संपवून विराट एअरपोर्टवरून थेट अनुष्काच्या घरी गेला. डिसेंबर 2017 मध्ये अनुष्काने विराटसोबत लग्नगाठ बांधली आणि आपल्या नात्याबद्दलच्या सर्व वृत्तांना दुजोरा दिला.