नवी दिल्ली - भारताचा कर्णधार विराट कोहली जर का १५ वर्षापूर्वी क्रिकेट खेळला असता तर माझीही गोलंदाजी फोडून काढली असती, असे वक्तव्य शेन वॉर्नने केले आहे. आपल्या जादूई फिरकीने भल्या भल्या फलंदाजांची भंबेरी उडविणारा शेन वॉर्न विराट कोहलीचे तोंडभरुन कौतुक करत आहे.
शेन वॉर्न पुढे बोलताना म्हणाला, की फलंदाज आणि कर्णधार म्हणून त्याने स्वत:ला सिद्ध केले आहे. तो महान कर्णधार आहे. त्याची कामगिरी पाहून मीही त्याचा चाहता झालो आहे. माझ्या गोलंदाजीवर देखील त्याने हल्ला चढविला असता. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याने वाखण्याजोगी कामगिरी केली आहे. येथे मालिका जिंकून साऱ्यांची मने जिंकली आहे. येथे येऊन त्याने इतिहास घडविला आहे.
विराट एक आक्रमक खेळाडू आहे. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात परिस्थितीनुरुप तो आपल्या खेळात बदल करतो. एक परिपूर्ण खेळाडू म्हणून विराटकडे पाहता येईल असेही वॉर्न म्हणाला.