नवी दिल्ली - गेल्या काही वर्षांपासून क्रिकेटमधील तीन प्रकारांवर वर्चस्व गाजवलेल्या भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीची प्रसिद्ध इंग्रजी मासिकाने गेल्या दशकातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून निवड केली आहे. या मासिकाने गेल्या १० वर्षात ५० सर्वोत्कृष्ट कामगिरी करणा-या क्रिकेटपटूंची यादी तयार केली असून यामध्ये पुरुष आणि महिला अशा दोनही गटांचा समावेश केला आहे.
हेही वाचा - पाकचा माजी खेळाडू म्हणतो, 'गांगुलीची ४ देशांच्या मालिकेची कल्पना बेकार'
या यादीत कोहली शिवाय ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन (१४ वे स्थान), एकदिवसीय सामन्यात तीन दुहेरी शतके झळकावणारा रोहित शर्मा (१५ वे स्थान), विश्वचषक -२०११ च्या विजेत्या भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी (३५ वे स्थान), अष्टपैलू रवींद्र जडेजा (३६ वे स्थान) आणि महिलांचा समावेश आहे. संघात अनुभवी महिला फलंदाज मिताली राजचाही (४० वे स्थान) समावेश आहे.
'भारतीय कर्णधार या दशकाच्या सर्वोत्कृष्ट खेळाडूची एकमताने निवड होती. विराट कोहलीने या दशकात आंतरराष्ट्रीय स्तरावर इतर कोणत्याही खेळाडूपेक्षा जास्त म्हणजे २०९६० धावा केल्या आहेत', असे या मासिकाने कोहलीबद्दल लिहिले आहे. सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दक्षिण आफ्रिकेचा हाशिम अमला दुसर्या स्थानावर आहे. या दशकात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने १०० शतकांचा इतिहास रचला आणि त्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप दिला होता.
२०१० ते २०१९ दरम्यान विराटने आपल्या ७० शतकांपैकी ६९ शतके केली. त्याने आतापर्यंत कर्णधार म्हणून एकूण १६६ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.