पुणे - भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली पुण्यात खेळल्या गेलेल्या भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-२० सामन्यात कर्णधार म्हणून ११००० आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण करणारा वेगवान फलंदाज ठरला आहे. तिसर्या टी-२० सामन्यातील १३ व्या षटकात त्याने हा विक्रम केला.
हेही वाचा - #HBDRahulDravid : पदार्पणाच्याच सामन्यात 'निवृत्त' झालेला एकमेव क्रिकेटपटू!
या सामन्यात विराट सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला होता. याआधी त्याने २०१८ मध्ये आयर्लंडविरुद्ध सहाव्या क्रमांकावर फलंदाजी केली होती. तेव्हा तो दुसऱ्याच चेंडूवर माघारी परतला. मात्र, लंकेविरुद्धच्या सामन्यात त्याने २६ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली आणि धावबाद झाला.
कोहलीने कर्णधार म्हणून १६९ सामन्यात ११००० धावा पूर्ण केल्या आहेत. असा पराक्रम करणारा तो सहावा आंतरराष्ट्रीय कर्णधार आणि दुसरा भारतीय कर्णधार ठरला आहे. याआधी हा विक्रम रिकी पाँटिंग, ग्रॅमी स्मिथ, स्टीफन फ्लेमिंग, एमएस धोनी आणि अॅलन बॉर्डन यांनी केला आहे. तथापि, कर्णधार म्हणून १५००० पेक्षा जास्त धावा करणारा एकमेव खेळाडू पाँटिंग आहे. ऑस्ट्रेलियाचा 'रनमशीन' स्मिथच्या नावावर १४००० धावा आहेत. त्याचबरोबर फ्लेमिंग आणि धोनीच्या नावावर ११००० धावा आहेत.