दुबई - भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत अव्वल स्थान कायम राखले आहे. पाकिस्तान आणि झिम्बाब्वे यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेनंतर बुधवारी ताजी एकदिवसीय क्रमवारी जाहीर झाली.
बाबर आझम तिसऱ्या स्थानी -
पाकिस्तानचा अष्टपैलू इमाद वसीमने क्रमवारीत तीन स्थानांनी झेप घेतली असून त्याला ४९वे स्थान मिळाले आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम तिसर्या क्रमांकावर आहे, पण त्याच्या रेटिंग गुणांमध्ये आठ गुणांनी वाढ झाली आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत आझमने २२१ धावा केल्या.
झिम्बाब्वेकडून ब्रेंडन टेलर आणि सीन विल्यम्स यांना फायदा झाला. टेलरने नऊ स्थानांनी वर आला त्यांना ४२वे स्थान मिळाले आहे. पहिल्या सामन्यात खेळलेल्या ११२ धावांच्या खेळीसह त्याने एकूण २०४ धावा केल्या. विल्यम्सने ४६व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. त्याने तीन सामन्यात १९७ धावा केल्या. गेल्या सामन्यात विल्यम्सने नाबाद ११८ धावा केल्या.
गोलंदाजीत बोल्ट अव्वल -
वेगवान गोलंदाजांमध्ये न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट प्रथम स्थानावर आहे. त्याच्यापाठोपाठ भारताचा जसप्रीत बुमराह आहे. पाकिस्तानच्या शाहीन आफ्रिदी आपल्या कारकिर्दीतील सर्वोच्च क्रमांकावर १६व्या स्थानी पोहोचला आहे. शाहीनने आठ स्थानांची कमाई केली आहे.