चेन्नई - इंग्लंड संघ भारताच्या दौऱ्यावर ४ कसोटी, ५ टी-२० व ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दौऱ्याची सुरुवात ५ फेब्रुवारी पासून चेन्नई येथे होणाऱ्या कसोटी सामन्याने होईल. या सामन्यापूर्वी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने भारत अभेद्य नसल्याचे म्हटले आहे.
हेही वाचा - सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी : कार्तिकच्या नेतृत्वात तामिळनाडूचे दुसरे विजेतेपद
ब्रॉड म्हणाला, ''ऑस्ट्रेलियामधील ऐतिहासिक कसोटी मालिका जिंकल्यानंतर भारताचा आत्मविश्वास कमालीचा उंचावला आहे. ब्रिस्बेनमधील त्या निर्णायक सामन्यात इंग्लंड संघाचे काही खेळाडू टीम इंडियाचे समर्थकही होते. त्यांनी जिंकण्याप्रती दाखवलेली इच्छाशक्ती अभूतपूर्व होती. दुखापतीनंतरही भारताने जे केले त्याचा जगातील कोणत्याही संघाला अभिमान वाटेल. या कारणास्तव, ते आयसीसीच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत अव्वल आहेत. पण आता काही आठवड्यांनंतर आम्ही त्यांचे प्रतिस्पर्धी बनलो आहोत. त्यामुळे आम्हाला आता भारताबद्दल फारसा विचार करायचा नाही. ते अभेद्य नाहीत.''
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जाण्यासाठी भारताला इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका २-० अशा फरकाने जिंकण्याची गरज आहे. जर भारताने एक कसोटी सामना गमावला तर, त्यांना इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित तीन कसोटी सामन्यात विजय मिळवावा लागेल. दुसरीकडे, इंग्लंडला भारताला ३-० असे हरवावे लागेल. इंग्लंडने २-२ अशी बरोबरी साधली तरी तो गुणलातिकेत भारताला मागे टाकू शकत नाही.