जोहान्सबर्ग - दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज व्हर्नान फिलँडरला त्याच्या शेवटच्या कसोटी सामन्यात आयसीसीने दंड आकारला. वँडर्स स्टेडियमवर इंग्लंडविरूद्ध झालेल्या चौथ्या कसोटीत फिलँडरने फलंदाज जॉस बटलरला बाद केल्यानंतर चूकीचे वर्तन केले होते. या घटनेबद्दल फिलँडरच्या खात्यात डिमेरिट गुणही जोडण्यात आला आहे.
हेही वाचा - दिग्गज बास्केटबॉलपटू कोबी ब्रायंटसह त्याच्या मुलीचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू
'इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीच्या दुसर्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज फिलँडरला आयसीसी आचारसंहितेच्या लेव्हल -१ चे उल्लंघन केल्याबद्दल सामना शुल्काच्या १५ टक्के दंड ठोठावण्यात आला आहे', असे आयसीसीने आपल्या निवेदनात म्हटले आहे. या सामन्यानंतर फिलँडर निवृत्त होणार आहे.
इंग्लंडसोबतची कसोटी मालिका संपताच फिलँडर सोमरसेटमध्ये सामील होईल. ३४ वर्षीय फिलँडर क्लबचे सर्व सामने खेळणार आहे. यापूर्वी तो २०१२ मध्ये क्लबकडून खेळला होता. पाच सामन्यांच्या करारादरम्यान फिलँडरने २३ बळी घेतले होते.
फिलँडरने २००७ मध्ये आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तर कसोटीत २०११ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध संघात 'एन्ट्री' केली होती. त्याने पदार्पणाच्या सामन्यात १५ धावात ५ गडी बाद करत लक्ष वेधले होते. त्यानं कसोटी क्रिकेटमध्ये अवघ्या ७ सामन्यांत ५० विकेट पूर्ण केल्या असून १९०० सालापासून अशी कामगिरी करणारा तो एकमेव गोलंदाज आहे.