केपटाऊन - आयसीसी १९ वर्षाखालील विश्वकरंडक स्पर्धेत, भारताने ऑस्ट्रेलियाचा ७४ धावांनी धुव्वा उडवत उपांत्य फेरी गाठली. भारताने दिलेले २३४ धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियाला पेलवले नाही. कार्तिक त्यागी आणि आकाश सिंग यांच्या भेदक माऱ्यासमोर ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ सर्वबाद १५९ धावा करू शकला. ४ गडी बाद करणाऱ्या कार्तिकला सामनावीरच्या पुरस्काराने गौरवण्यात आले.
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. तेव्हा प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या भारताची अवस्था ३ बाद ५४ अशी झाली होती. त्यावेळी एका बाजूने यशस्वी जयस्वाल याने दमदार फलंदाजी केली. त्याने ६ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ६२ धावांची खेळी साकारली. यशस्वी बाद झाल्यावर अथर्व अंकोलेकरने अर्धशतक झळकावले. अथर्वने ५ चौकार आणि १ षटकारासह नाबाद ५५ धावांची खेळी साकारली. त्यामुळेच भारताला २३३ धावा करता आल्या.
भारताचे २३४ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलिया सुरुवात खराब झाली. सलामीवर जेक फ्रेझर-मॅकगर्क शून्यावर धावबाद झाला. त्यानंतर कार्तिक त्यागीने ऑस्ट्रेलियाला ३ धक्के दिले. त्याने कर्णधार मॅकेंजी हार्वी (४), लाचलान हियर्ने (०) आणि ओलिवर डेविस (२) यांना बाद केले. ऑस्ट्रेलियाची अवस्था ४ बाद १७ धावा अशी झाली होती. तेव्हा सलामीवीर सॅम फॅननिंग आणि पॅट्रिक रोवे यांनी भागिदारी रचण्याचा प्रयत्न केला.
कार्तिक त्यागीने पॅट्रिक रोवेला (२१) बाद करत संघाला पाचवे यश मिळवून दिले. रोवे बाद झाल्यानंतर लियाम स्कॉट आणि सॅम यांनी सहाव्या गडीसाठी अर्धशतकी भागिदारी केली आणि संघाला शंभरी पार करून दिली. ही भागिदारी रवीने मोडली. त्याने लियामला (३५) ध्रुवकरवी झेलबाद केले.
दुसऱ्या बाजूने सॅमने आपले व्यक्तिगत अर्धशतक पूर्ण केले. मात्र, धावगती वाढवण्याच्या नादात तो बाद झाला. आकाश सिंहने त्याला ध्रुवकरवी झेलबाद केले. त्याने १२७ चेंडूत ७५ धावांची खेळी केली. मात्र, तो संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला. सॅम बाद झाल्यानंतर, ऑस्ट्रेलियाचे 'शेपूट' भारतीय गोलंदाजानी ४ धावामध्ये गुंडाळले. ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ १५९ धावांवर आटोपला.
हेही वाचा - पत्नी साक्षीने केले धोनीचे 'खुलेआम' रॅगिंग, पाहा व्हिडिओ
हेही वाचा - यंदाच्या आयपीएल स्पर्धेत 'हे' दोन नवीन नियम होणार लागू