लाहोर - पाकिस्तानचा मधल्या फळीतील फलंदाज उमर अकमलवरील बंदी दीड वर्षांनी कमी करण्यात आली आहे. क्रिकेट पाकिस्तानच्या अहवालानुसार, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश (निवृत्त) फकीर मुहम्मद खोखर यांनी स्वतंत्र न्यायाधीश म्हणून उमर अकमल आणि दुसऱ्या पक्षाची बाजू ऐकल्यानंतर आपला निर्णय दिला.
सामना फिक्सिंग प्रस्तावाबद्दल मंडळाला माहिती न दिल्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) उमरला क्रिकेटशी संबंधित सर्व कामकाजावर तीन वर्षासाठी बंदी घातली होती. आता त्याच्या बंदीला अवघ्या 18 महिन्यांचा कालावधी असल्याने 19 ऑगस्ट 2021 पासून तो पुन्हा क्रिकेट खेळू शकणार आहे.
उमरने पाकिस्तानकडून 16 कसोटी, 121 एकदिवसीय आणि 84 टी-20 सामने खेळले आहेत. त्याने एका मुलाखतीत सांगितले होते की, भारत विरुद्धच्या सामन्यात फिक्सिंगच्या ऑफरशिवाय, त्याला एका सामन्यात दोन चेंडू सोडण्याचीही ऑफर मिळाली होती.
पाकिस्तान सुपर लीगची (पीएसएल) पाचवी आवृत्ती सुरू होण्यापूर्वी अकमलला फिक्सिंगची ऑफर देण्यात आली होती. पीसीबीच्या लाचलुचपत प्रतिबंधक संहितेअंतर्गत एखाद्या खेळाडूला फिक्सिंगसाठी काही प्रस्ताव आल्यास ते विनाविलंब मंडळाला कळवावे असे बंधनकारक आहे. तसे न केल्याबद्दल शिक्षेची तरतूद आहे.