कोलंबो - श्रीलंकेमध्ये सुरू असलेल्या १९ वर्षाखालील आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाने, पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला ६० धावांनी धूळ चारली. भारताने अर्जुन आझाद आणि एन. टी. तिलक वर्माच्या शतकी खेळींच्या जोरांवर ३०५ धावांपर्यंत मजल मारली होती. तर गोलंदाजीत मुंबईच्या अथर्व अंकोलेकरने ३ गडी बाद करत पाकिस्तानच्या संघाला खिंडार पाडले.
भारत विरुध्द पाकिस्तान या संघामध्ये रंगलेल्या सामन्यात भारतीय कर्णधार ध्रुव जुरेलने याने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा सलामीवीर सुविद पारकर अवघ्या ३ धावांवर बाद झाला. यानंतर अर्जुन आझाद आणि तिलक वर्माने दुसऱ्या गडीसाठी १८३ धावांची भागीदारी करत भारताच्या डावाला आकार दिला. अर्जुन आझादने १२१ तर तिलक वर्माने ११० धावांची खेळी केली. मात्र, दोघे बाद झाल्यानंतर भारताची मधली फळी कोसळली आणि भारताने ९ गड्यांच्या मोबदल्यात ३०५ धावांपर्यंत मजल मारली.
'हौसले जिंदा है', 'चांद्रयान - २' च्या मोहिमेवर खेळाडूंनी दिल्या प्रतिक्रिया...
पाकिस्तानकडून नसीम शाह, अब्बास आफ्रिदीने प्रत्येकी ३-३ बळी घेतले. त्याला आमिर अली आणि मोहम्मद आमिरने १-१ बळी घेत चांगली साथ दिली.
भारताच्या ३०५ धावांच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानी संघाची सुरुवात खराब झाली. हैदर अली आणि अब्दुलला विद्याधर पाटील याने बाद केले. यानंतर फहाद मुनीरही बाद झाला. यानंतर कर्णधार रोहिल नाझीर आणि हारिस खानने पाकिस्तानच्या डाव सावरला. रोहिल नाझीरने ११७ धावांची खेळी करत भारताला कडवी झुंज दिली. तेव्हा नाझीरला अथर्वने बाद केले. यानंतर पाकिस्तानच्या तळातील फलंदाज संघाला विजय मिळवून देऊ शकले नाही. अखेर भारताने पाकिस्तानला २४५ धावांवर रोखत भारताने ६० धावांनी सामन्यात बाजी मारली.
गौतम गंभीर म्हणतो...संजू सॅमसन चंद्रावरही फलंदाजी करु शकतो
भारताकडून अथर्व अंकोलेकरने ३, विद्याधर पाटील आणि सुशांत मिश्रा यांनी प्रत्येकी २-२ तर आकाश सिंह आणि करण लालने १-१ बळी घेतले.