मँचेस्टर - ओल्ड ट्रॅफर्ड येथे सुरू असलेल्या इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसअखेर पाकिस्तानने ८ बाद १३७ धावा केल्या आहेत. चौथ्या दिवसात पाकिस्तानचा दुसरा डाव लवकर आटोपण्याची शक्यता आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा यासिर शाह १२ आणि मोहम्मद अब्बास शून्यावर खेळत होते. इंग्लंडकडून वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड, ख्रिस वोक्स आणि बेन स्टोक्स यांनी प्रत्येकी दोन बळी घेत पाकच्या संघाला खिंडार पाडले. पाकिस्तानकडे अद्याप २४४ धावांची आघाडी आहे.
तत्पूर्वी, इंग्लंडचा पहिला डाव २१९ धावांवर गडगडला. शंभर धावांच्या आतच चार फलंदाज माघारी परतल्यानंतर ओली पोप आणि जोस बटलरने किल्ला लढवला. पोपने ८ चौकारांसह ६२ धावा केल्या. तर, बटलर ३८ धावांवर बाद झाला. युवा गोलंदाज नईम शाहने पोपला बाद केले. या दोघानंतर जोफ्रा आर्चर आणि स्टुअर्ट ब्रॉड यांनी संघाच्या खात्यात बहुमूल्य धावा जोडल्या. फिरकीपटू यासिर शाहने ६६ धावांत ४ बळी टिपले. तर, मोहम्मद अब्बास आणि शादाब खान यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक -
नाणेफेक - पाकिस्तान (फलंदाजी)
पाकिस्तान पहिला डाव - सर्वबाद ३२६
इंग्लंड पहिला डाव - सर्वबाद २१९
पाकिस्तान दुसरा डाव - ८ बाद १३७