नवी दिल्ली - कसोटी क्रिकेटची सुरूवात मार्च १८७७ मध्ये झाली. त्यानंतर क्रिकेटमध्ये अनेक बदल झाले. कसोटी क्रिकेटनंतर एकदिवसीय आणि आता टी-२० प्रकार उदयास आला. मात्र, कसोटी क्रिकेटची लोकप्रियता १४० वर्षे उलटल्यानंतरही अद्याप कायम आहे. विशेष म्हणजे, आता कसोटी अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात झाली आहे. स्पर्धेच्या गुणातालिकेत भारतीय संघ अव्वल असला तरी ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड यासारखे संघ उत्तम कामगिरी करत आहेत.
कसोटीत एका डावात ६०० ही धावसंख्या प्रतिस्पर्धी संघाचा आत्मविश्वास डगमळीत करण्यासाठी उपयुक्त ठरते. आजवर अनेक संघानी एका डावात ६०० धावा जमवल्या आहेत. मात्र, एका डावात सर्वाधिक धावा जमवण्याचा मान श्रीलंकेकडे आहे. १९९७ मध्ये श्रीलंकेने कोलंबोच्या मैदानात भारताविरुध्द एका डावात ९५२/६ धावा केल्या होत्या. पण, कसोटी क्रिकेटमध्ये ६०० हून अधिक धावा करणारा पहिला संघ ऑस्ट्रेलिया असून त्यांनी १९२५ मध्ये इंग्लंड विरुध्द सर्वबाद ६०० धावा केल्या होत्या. आज आम्ही तुम्हाला कोणत्या संघांनी किती वेळा ६०० धावा केल्या आहेत. हे सांगणार आहोत...
ऑस्ट्रेलिया -
ऑस्ट्रेलिया संघाने आजघडीपर्यंत ३४ वेळा ६०० पार धावा केल्या आहेत. पहिल्यांदा त्यांनी जानेवारी १९२५ ला इंग्लंड विरुध्द खेळताना सर्वबाद ६०० धावा केल्या होत्या. हा सामना ऑस्ट्रेलियाने ८१ धावांनी जिंकला. ऑस्ट्रेलियाची कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक धावसंख्या ७५८ इतकी आहे. १९५५ मध्ये वेस्ट इंडीज विरुध्द खेळताना ऑस्ट्रेलियाने एका डावात या धावा जमवल्या होत्या.
भारत -
एका डावात सर्वाधिक वेळा ६०० पार धावा करणाऱ्या संघांच्या यादीत भारताचा दुसरा क्रमांक लागतो. भारताने आजपर्यंत ३३ वेळा ६०० पार धावा रचल्या आहेत. सर्वात अगोदर भारताने फेब्रुवारी १९७९ मध्ये वेस्ट इंडीज विरुध्द खेळताना ६४४/७ धावा केल्या होत्या. भारताने एका डावात सर्वाधिक ७५९ धावा केल्या आहेत. ही धावसंख्या भारताने डिसेंबर २०१६ मध्ये इंग्लंडविरोधात रचली होती.
इंग्लंड -
यादीत इंग्लंडचा तिसरा क्रमांक लागतो. त्यांनी २० वेळा ६०० पार धावा केल्या आहेत. पहिल्यादा इंग्लंडने १९२८ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुध्द ६०० पार धावा केल्या होत्या. इंग्लंडची एका डावातील सर्वाधिक धावसंख्या ९०३/७ इतकी आहे. जी इंग्लंडने ऑस्ट्रेलियाविरुध्द १९३८ मध्ये केली होती.
वेस्ट इंडीज -
विडींजने २० वेळा एका डावात ६०० पार धावा केल्या आहेत. १९४८ मध्ये भारताविरुध्द खेळताना विडींजने पहिल्यांदा ६०० पार धावा केल्या होत्या. विडींजची एका डावातील सर्वाधिक धावसंख्या ७९०/३ आहे. ही खेळी त्यांनी पाकिस्तान विरुध्द १९५८ मध्ये केली होती.
पाकिस्तान -
पाकिस्तानने १५ वेळा एका डावात ६०० पार धावा केल्या आहेत. १९५८ मध्ये पाकिस्तानने वेस्ट इंडीज विरुध्द खेळताना पहिल्यांदा सहाशे पार धावा केल्या होत्या. पाकची एका डावातील सर्वाधिक धावसंख्या ७६५/६ इतही आहे. २००९ मध्ये पाकने श्रीलंकेविरुध्द खेळताना ही धावसंख्या उभारली होती.
याशिवाय एका डावात ६०० पार धावा करणाऱ्या संघाच्या यादीत श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि बांगलादेशचा समावेश आहे. त्यांनी अनुक्रमे १३,१२, ९ आणि १ वेळा धावसंख्या उभारली आहे.