नवी दिल्ली - 23 डिसेंबर 2004 रोजी महेंद्रसिंह धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिले पाऊल ठेवले. बांगलादेशविरुद्ध पदार्पण करण्यापूर्वी धोनीने भारत 'अ' संघासाठी शानदार प्रदर्शन केले होते. ही मालिका झिम्बाब्वेमध्ये झाली. या मालिकेत झिम्बाब्वेचा माजी कर्णधार ततेंदा तैबुने धोनीला पहिल्यांदा पाहिले. या मालिकेची आठवण काढत तैबुने मोठे वक्तव्य केले आहे.
तैबू म्हणाला, "धोनी भारताच्या संघासोबत आला होता. मला वाटले की कार्तिककडे यष्टिरक्षणात आणि फलंदाजीत धोनीपेक्षा अधिक नैसर्गिक खेळ आहे.''
पुढे तैबूने धोनीच्या तांत्रिक क्षमतेचा उल्लेख केला. तो म्हणाला, "धोनी यष्टिरक्षण करत असला तरी त्याची पद्धत थोडी वेगळी असते. सहसा यष्टिरक्षण करताना यष्टिरक्षकांच्या दोन्ही हातांची छोटी बोटे एकत्र असतात पण धोनीच्या बाबतीत तसे नसते. पण काही वेगळ्या तंत्राने तो चेंडू पकडतो. धोनी कधीही यष्टिरक्षणाचा सराव करत नव्हता. तो नेहमीच नेटमध्ये गोलंदाजीचा आणि फलंदाजीचा सराव करायचा.''
तैबू पुढे म्हणाला, ''धोनीच्या फलंदाजीमध्येही तेच आहे. त्याचे तंत्र भिन्न आहे. परंतु डोळे व हात यांचा सुसंवाद आणि मानसिक सामर्थ्य आश्चर्यकारक आहे. तुमची शैली वेगळी असेल तर प्रशिक्षक बदल करायला सांगतात. पण धोनीची आकडेवारी सर्वांना चुकीची ठरवते."
कारकिर्दीत धोनीने 90 कसोटी सामन्यांमध्ये 4876 धावा केल्या आहेत. त्यामध्ये 6 शतकांचा समावेश आहे. धोनीने एकदिसीय क्रिकेटमध्ये 10,773 धावा आणि टी-20 मध्ये 1617 धावा केल्या आहेत.