मुंबई - आम्ही २ एप्रिल हा दिवस होळी आणि दिवाळी साजरा करतो, असे भारताचा डावखुरा फलंदाज सुरेश रैनाने सांगितले. टीम इंडियाने २ एप्रिल २०११ रोजी श्रीलंकेला धूळ चारत विश्वकरंडकाला गवसणी घातली होती. रैना विजयी संघाचा सदस्य होता. या दिवशाची आठवण सांगताना, रैनाने अनेक गोष्टींचा उलगडा केला आहे. त्याने गोलंदाजीमधील सचिन तेंडुलकर कोण होता? हेही सांगितले आहे.
रैनाने सांगितले की, 'गोलंदाजीची कमान जहीर खानने सांभाळली. तो या विभागाचा सचिन तेंडुलकर ठरला. कारण त्याने संपूर्ण स्पर्धेत चांगली कामगिरी केली. तसेच तो वेळोवेळी आपले सहकारी गोलंदाजांना मार्गदर्शन करत असे. संघाला जेव्हा विकेटची गरज असायची तेव्हा तो मदतीला धावून आला. आमचे सर्व निर्णय योग्य ठरले.'
जहीरने या स्पर्धेत १८.७६ च्या सरासरीने २१ विकेट घेतले होते. तो स्पर्धेत सर्वात जास्त विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत शाहिद आफ्रिदीसोबत संयुक्तीक पहिल्या क्रमांकावर होता. दरम्यान, रैनानेही या स्पर्धेत चांगले योगदान दिले. त्याने नॉकआउट सामन्यासह उपांत्यपूर्व आणि उपांत्य फेरीत चांगली कामगिरी केली. रैनाने उपांत्यपूर्व सामन्यात नाबाद ३४ तर उपांत्य फेरीच्या सामन्यात ३६ धावा केल्या होत्या.
वानखेडे स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात, महेंद्रसिंह धोनीने श्रीलंकेचा गोलंदाज नुवान कुलसेकराला षटकार ठोकत भारताच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले होते. भारताच्या खेळाडूंनी विजयानंतर दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरला मानवंदना देताना, त्याला आपल्या खांद्यावर उचलले आणि वानखेडे स्टेडियमला एक फेरी मारली. आजही तो सामना क्रिकेटप्रेमींच्या आठवणीत आहे.
पाकचा बुमराहला ट्रोल करण्याचा प्रयत्न, भारतीय चाहत्यांनी घेतला समाचार
'त्याची' मदत पाहून वृद्ध महिलेच्या डोळ्यात आलं पाणी, हरभजनने शेअर केला VIDEO