नवी दिल्ली - भारताच्या मर्यादित षटकांच्या संघाचा उपकर्णधार रोहित शर्माची कर्णधारपदाची शैली विराट कोहलीपेक्षा अगदी वेगळी दिसते. रोहितचे नेतृत्त्व महेंद्रसिंह धोनीप्रमाणेच आहे, असे सुरेश रैनाने म्हटले. रोहितचा शांत स्वभाव आणि खेळाडूंना प्रेरणा देण्याची क्षमता धोनी सारखीच असल्याचेही रैना म्हणाला.
रैना म्हणाला, "रोहितचे नेतृत्त्व धोनीसारखे आहे. तो शांत आहे आणि ज्या प्रकारे त्याने खेळाडूंना प्रेरणा दिली आहे. ते खूप चांगले आहे. जेव्हा तो फलंदाजीला जाईल तेव्हा तो चांगल्या धावा करेल. या आत्मविश्वासामुळे इतर खेळाडूही शिकतात. रोहितबद्दल मला ही गोष्ट आवडते."
रैना पुढे म्हणाला, "नुकताच मी पुण्याविरुद्ध खेळलेला आयपीएलचा अंतिम सामना पाहिला. रोहितने कर्णधार म्हणून दोन चांगले बदल केले होते. ज्या प्रकारे तो कठीण परिस्थिती हाताळत होता, त्याने विकेटवरील मधल्या षटकात बदल केले. त्याच्याकडे पाहता तो स्वतः सर्व निर्णय घेत असल्याचे दिसून आले. बाहेरून सल्ला घ्यावा, परंतु मनात काय करावे हे माहित असायला आहे. कर्णधार म्हणून अधिक विजेतेपदे जिंकल्याबद्दल आपल्याला त्याच्याबद्दल आश्चर्य वाटायला नको."