कोलंबो - श्रीलंकेच्या पोलिसांनी 2011च्या विश्वकरंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्याबाबतचा तपास थांबवला आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळवण्यात आलेला हा सामना फिक्स होता, असा आरोप लंकेचे माजी क्रीडामंत्री महिंदानंदा अल्थागामगे यांनी केला होता. या आरोपानंतर चौकशी सुरू करण्यात आली होती.
या आरोपाबाबत कोणताही पुरावा सापडला नसल्याचे श्रीलंकेच्या पोलिसांनी सांगितले आहे. पोलिसांनी तत्कालीन कर्णधार कुमार संगकारा आणि महेला जयवर्धने यांचा जबाब नोंदवून घेतला आहे. पोलिस अधीक्षक जगत फोनसेका यांनी पत्रकारांना सांगितले, "आम्ही हा अहवाल क्रीडा मंत्रालयाच्या सचिवांकडे पाठवत आहोत, ज्यांनी आम्हाला सूचना दिल्या होत्या. आम्ही आज अंतर्गत चर्चेनंतर तपास संपवला आहे."
क्रीडा-संबंधित गुन्हेगारी रोखण्यासाठी फोनसेका स्पेशल इन्व्हेस्टिगेशन युनिटचे प्रमुख आहेत. त्यांच्या मते, अल्थागामगे यांनी 14 आरोप केले होते. फोनसेका म्हणाले, ''खेळाडूंकडून आणखी चौकशी का करावी असे आम्हाला कोणतेही कारण दिसत नाही.''
अंतिम तपासात संघाचे तत्कालीन मुख्य निवडकर्ता अरविंद डी सिल्वा, संगकारा, सलामीवीर उपुल थरंगा आणि महेला जयवर्धने यांची चौकशी केली आहे. 2 एप्रिल 2011 रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळलेला अंतिम सामना भारतीय संघाने सहा गडी राखून जिंकला. श्रीलंकेला अंतिम सामन्यात सलग दुसर्यांदा पराभव पत्करावा लागला.